FDAची पुणे-सोलापुरात धडक कारवाई विना लेबल तूप व संशयित भेसळीचे नमकीन जप्त, १.२२ लाखांचा साठा ताब्यात

FDAची पुणे-सोलापुरात धडक कारवाई विना लेबल तूप व संशयित भेसळीचे नमकीन जप्त, १.२२ लाखांचा साठा ताब्यात
‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत FDAने पुणे आणि सोलापूरमध्ये धडक कारवाई करत विना लेबल तूप व भेसळीच्या संशयित नमकीनचा १.२२ लाखांचा साठा जप्त केला. पुण्यातील एका आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला.
पुणे ०४ जुलै २०२६ : राज्यात सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ नागरिकांपर्यंत पोहोचावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे आणि सोलापूर येथे करण्यात आलेल्या धडक कारवाईत विना लेबल तूप तसेच भेसळीच्या संशयावरून नमकीनचा एकूण सुमारे १ लाख २२ हजार ५०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने पुण्यातील एका अन्न व्यवसायाचा परवानाही तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जात आहे. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि नियमांनुसार तयार केलेले अन्न उपलब्ध करून देणे हा आहे.
पुण्यातील पिंपळे गुरव परिसरातील ‘देवांश मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स’ या आस्थापनेची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तपासणीदरम्यान सुमारे २३० किलो वजनाचा आणि अंदाजे ९० हजार ५०० रुपयांचा तुपाचा साठा विना लेबल आढळून आला. तसेच या तुपाबाबत भेसळीचा संशयही व्यक्त करण्यात आला. त्यामुळे संबंधित साठा तात्काळ जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) विश्वजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आणि त्यांच्या पथकाने केली. तपासणीदरम्यान आवश्यक नमुनेही पुढील प्रयोगशाळा चाचणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, सोलापूरमध्येही अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ‘संगीता फूड प्रॉडक्ट्स’ या आस्थापनेची तपासणी केली. यावेळी लेबलिंगमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून १६० किलो नमकीनचा सुमारे ३२ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून प्रयोगशाळेच्या अहवालानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
अन्न सुरक्षा विभागाने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विनापरवाना व्यवसाय, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ, चुकीचे लेबलिंग, भेसळयुक्त उत्पादनांची निर्मिती किंवा विक्री करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाईसह परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची प्रक्रिया देखील राबवली जाईल.
अन्नपदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी उत्पादनावरील लेबल, उत्पादनाची तारीख, कालबाह्यता तारीख, उत्पादकाची माहिती आणि FSSAI परवाना क्रमांक तपासणे आवश्यक आहे. संशयास्पद अन्नपदार्थ किंवा भेसळीची शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सुरक्षित अन्न हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून त्यासाठी राज्यभर तपासणी आणि अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare