FDA Action: पुरंदरमध्ये आंबा प्रक्रिया केंद्रांवर मोठी कारवाई; ५,७०० किलो सडके आंबे नष्ट, लाखोंचा पल्प जप्त

पुरंदरमध्ये आंबा प्रक्रिया केंद्रांवर मोठी कारवाई; ५,७०० किलो सडके आंबे नष्ट, लाखोंचा पल्प जप्त
पुरंदर तालुक्यात FDA ची मोठी कारवाई. सोनोरी आणि बोपगाव येथील आंबा प्रक्रिया केंद्रांवर ५,७०० किलो सडके आंबे नष्ट, लाखो रुपयांचा आंबा पल्प आणि आमरस जप्त. संबंधित आस्थापनाचा परवाना निलंबित.
पुणे १७ जून २०२६ : पुरंदर तालुक्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू ठेवली आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि बोपगाव येथील आंबा प्रक्रिया केंद्रांवर मोठे छापे टाकण्यात आले. या कारवाईत ५,७०० किलो सडलेले व हलक्या प्रतीचे आंबे नष्ट करण्यात आले असून लाखो रुपयांचा आंबा पल्प आणि आमरस जप्त करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा विभागाने १२ आणि १३ जून रोजी विशेष मोहीम राबवत आंबा प्रक्रिया उद्योगांची तपासणी केली. तपासणीदरम्यान एका प्रक्रिया केंद्रात सुमारे ५,७०० किलो सडलेले व निकृष्ट दर्जाचे आंबे आढळून आले. या आंब्यांची बाजारमूल्य अंदाजे २.८५ लाख रुपये इतकी होती. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून हा संपूर्ण साठा जागीच नष्ट करण्यात आला.
याच कारवाईदरम्यान भेसळीच्या संशयावरून २,४३१ किलो आंबा पल्प जप्त करण्यात आला. या पल्पाची किंमत सुमारे २.९१ लाख रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. प्राथमिक तपासणीत संबंधित उत्पादनाबाबत संशय निर्माण झाल्याने पुढील तपासासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तसेच संबंधित आस्थापनाचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) परवाना निलंबित करण्यात आला आहे.
याशिवाय आणखी एका ठिकाणी १८ किलो पॅकबंद आणि ७१० किलो सुटा हापूस आमरस असा एकूण ७३ हजार ५२० रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला. या उत्पादनांचीही तपासणी करण्यात येणार असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आस्थापनांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. यापूर्वीही विविध जिल्ह्यांमध्ये भेसळयुक्त अन्नसाठे जप्त करून नष्ट करण्यात आले असून अनेक व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुरंदर तालुक्यातील या कारवाईमुळे आंबा पल्प आणि आमरस उत्पादन करणाऱ्या उद्योगांमध्ये खळबळ उडाली आहे. अन्न सुरक्षा विभागाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला माफ केले जाणार नाही. आगामी काळातही अशाच प्रकारच्या तपासण्या आणि धाडसत्र सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
अन्न प्रक्रिया उद्योगांनी उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वच्छता, गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ग्राहकांनीही खाद्यपदार्थ खरेदी करताना दर्जा, पॅकिंग, परवाना आणि उत्पादनाची माहिती तपासण्याचे आवाहन अन्न सुरक्षा विभागाने केले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare