शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे पुण्यात ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी शिवचरित्रावर मराठी व इंग्रजीत महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत.
सायली मेमाणे
पुणे १८ सप्टेंबर २०२५ : पुणे शहराने इतिहास अभ्यासकांच्या क्षेत्रातील एक मानबिंदू गमावला आहे. ज्येष्ठ शिवचरित्रकार आणि इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बुधवारी सायंकाळी हा दुःखद प्रसंग घडला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह देशातील इतिहास प्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मेहेंदळे यांनी इतिहास संशोधनासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले होते. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास सर्वत्र प्रसिद्ध होता. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये अनेक ग्रंथ लिहिले असून हे ग्रंथ आज इतिहास क्षेत्रात जगप्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये म्हणजे सत्य व असत्य उलगडण्याची त्यांची प्रामाणिक धडपड. त्यांना फारसी, मोडी, इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन अशा अनेक भाषांचे प्रभुत्व होते, ज्यामुळे इतिहासातील विविध लिपी आणि दस्तऐवजांचा सखोल अभ्यास करून त्यांनी संशोधन अधिक विश्वासार्ह बनवले.
इतिहास संशोधनाव्यतिरिक्त त्यांनी युद्ध पत्रकारितेतही योगदान दिले. १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान ते प्रत्यक्ष सीमेवर उपस्थित राहिले. बांगलादेश व पाकिस्तानच्या सीमेवरून त्यांनी युद्धाचा अभ्यास केला आणि ते अनुभव नोंदवले. त्यांच्या लेखनातून हा प्रत्यक्ष अनुभव जाणवतो. मेहेंदळे हे मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर होते. त्यामुळे लष्करी रणनीती, युद्ध तंत्र आणि इतिहास यांची सांगड त्यांच्या संशोधनात आढळते.
त्यांनी लिहिलेली पुस्तके इतिहासातील अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरली आहेत. शिवाजी झाला नसता तर, टिपू ॲज अ वॉर, शिवाजी लाईफ अँड टाईम, शिवचरित्र, मराठ्यांचे आरमार अशा अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचा समावेश त्यांच्या साहित्यसंपदेत आहे. याशिवाय सध्या ते औरंगजेब व इस्लामवरील संशोधनकार्य करत होते. दुसऱ्या महायुद्धावर आधारित त्यांचे मोठे पुस्तक प्रकाशनासाठी सज्ज झाले होते, ज्यामध्ये सुमारे पाच हजार पाने पूर्ण झाली होती.
गजानन मेहेंदळे यांचा जन्म १९ डिसेंबर १९४७ रोजी झाला. त्यांचे बालपणापासून इतिहासात विशेष आकर्षण होते. पुढे त्यांनी याच आवडीला संशोधनाचा पाया बनवला. भारत इतिहास संशोधक मंडळ, भांडारकर संस्था आणि इतर महत्त्वाच्या संशोधन संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. मुघलकालीन फारसी कागदपत्रांचे वाचन आणि त्यावर आधारित संशोधन निष्कर्ष काढणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. त्यांनी असंख्य व्याख्याने दिली आणि वृत्तपत्रे व मासिकांमधून महत्त्वपूर्ण लेखन केले.
त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक थोर संशोधक, विद्वान आणि इतिहास प्रेमी गमावला आहे. शिवचरित्र, युद्ध इतिहास आणि ऐतिहासिक सत्याचा शोध घेणाऱ्या या अभ्यासकाने दिलेला ठेवा पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. इतिहास क्षेत्रातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter