महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर दरवाढ; घरगुती गॅसच्या किमती मात्र स्थिर
महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर दरवाढ; घरगुती गॅसच्या किमती मात्र स्थिर
दसरा आणि दिवाळीपूर्वी महागाईचा झटका! १९ किलो कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात १५.५० रुपयांची वाढ, मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल नाही.
सायली मेमाणे
पुणे १ ऑक्टोबर २०२५ :ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. दिवाळी आणि दसरा सण जवळ येत असताना एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाल्याने व्यावसायिक वापरकर्त्यांची चिंता वाढली आहे. सरकारने जाहीर केलेल्या नव्या दरानुसार, राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत पूर्वी १५८० रुपये होती, मात्र आता ती वाढून १५९५.५० रुपये झाली आहे. म्हणजेच एका झटक्यात १५.५० रुपयांची दरवाढ झाली आहे.
दरवाढीचा परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खानावळी आणि व्यावसायिक गॅस वापरणाऱ्या लहान-मोठ्या उद्योगांवर होणार आहे. दिवाळीपूर्वीच महागाईचा हा वाढीव खर्च व्यापाऱ्यांवर पडणार असून त्याचा परिणाम ग्राहकांवरही होऊ शकतो. कारण गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरामुळे खाद्यपदार्थांच्या आणि इतर वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. यामुळे सामान्य घरगुती ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या घरगुती एलपीजी सिलिंडर पूर्वीच्या दरातच उपलब्ध आहे. तरीही, व्यावसायिक गॅसच्या दरवाढीमुळे दैनंदिन जीवनातील खर्च वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी सरकारने नागरिकांना दिलासा देण्यासाठी घरगुती गॅस सिलिंडरवर अनुदान जाहीर केले होते. मात्र कमर्शियल गॅस सिलिंडरवर कोणतेही अनुदान नसल्याने व्यावसायिकांना या दरवाढीचा थेट फटका बसतो. हॉटेल उद्योग आधीच मंदी आणि वाढत्या खर्चामुळे अडचणीत सापडला आहे. आता गॅस दरवाढीमुळे त्यांची आर्थिक गणिते आणखी बिघडू शकतात.
केंद्रीय पेट्रोलियम कंपन्यांच्या दरसूचीत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅस आणि कच्च्या तेलाच्या किमतीनुसार हे दर निश्चित केले जातात. जागतिक बाजारातील चढ-उतारांमुळे भारतात दरवाढीचा फटका सामान्य लोकांनाही बसतो. या वेळेस घरगुती गॅस स्थिर ठेवण्यात आला असला तरी, सणासुदीच्या काळात दरवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या काही महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये अनेकदा चढउतार झाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दर काहीसा स्थिर होता, परंतु आता पुन्हा दरवाढ झाली आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, दरवाढीचा भार ते एकट्याने सहन करू शकत नाहीत आणि त्यामुळे ग्राहकांवर तो ओझा टाकावा लागतो.
सध्या सर्वसामान्यांसाठी घरगुती गॅसच्या किंमतीत बदल नसल्याने काहीसा दिलासा आहे. मात्र पुढील काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्यास त्याचा परिणाम थेट घरगुती गॅस सिलिंडरवर होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे नागरिकांना भविष्यात अधिक दरांचा सामना करावा लागू शकतो.