मुंबईत आरक्षण मिळेपर्यंत कपडे न घालण्याची तरुणाची शपथ.
आरक्षण मिळेपर्यंत कपडे न घालण्याची तरुणाची शपथ.
मुंबईत मराठा आरक्षण आंदोलन तीव्र; एका तरुणाने आरक्षण मिळेपर्यंत कपडे न घालण्याचा निर्धार केला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, जरांगे पाटीलनी आंदोलकांना संयमाचे आवाहन केले.
सायली मेमाणे
पुणे ३ सप्टेंबर २०२५ : मुंबई आणि उपनगरात मराठा समाजाचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो नागरिक आझाद मैदानात उतरले आहेत. आंदोलनाला वेगवेगळ्या भागातून मोठा प्रतिसाद मिळत असून, याच पार्श्वभूमीवर एका तरुणाने अनोखाच निर्धार जाहीर केला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कपडे न घालण्याचा निर्धार त्याने केला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
मुंबईतील एसी लोकलमधील या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण या तरुणाच्या निर्धाराचे स्वागत करत आहेत, तर काहींनी अशा पद्धतीने आंदोलन करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र एवढे नक्की की या घटनेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाच दिवस पूर्ण झाले आहेत. जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. त्यांनी आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन केले असून, अतिरेक करणाऱ्या आंदोलकांवर नाराजी व्यक्त केली आहे. “गोष्टी संयमाने घ्या, नाहीतर तुम्ही आमच्यातले नाही असे समजले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आझाद मैदान, सीएसएमटी स्थानक, चर्चगेट तसेच नवी मुंबई आणि उपनगरांमध्येही आंदोलनाने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रवासी व आंदोलक यांच्यात गोंधळ टाळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना पोलिस स्टेशनमार्गे बाहेर सोडले जात असून, आंदोलकांना आझाद मैदानाकडे भुयारी मार्गाने जाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच आंदोलकांना थांबण्यासाठी विशेष रोप बांधून व्यवस्थाही करण्यात आली आहे.
दरम्यान, जरांगे यांनी सत्ताधारी सरकारवर देखील तीव्र टीका केली आहे. “गेल्या चार वर्षांपासून आम्ही आमचा हक्क मागतोय. आम्हाला मुंबईत येण्याची हौस नाही. सरकार गेल्या कित्येक दिवसांपासून हुल्लडबाजी करत आहे, ते दिसत नाही का? दोन वर्षांचा वेळ दिला तरी फक्त निराशा हाती आली. त्यामुळे आता आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
आंदोलनाला समाजातील काही घटकांनी पाठींबा दिला आहे तर काहींनी विरोधही दर्शवला आहे. मात्र, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाची भूमिका ठाम आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे या आंदोलनाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे. पुढील काही दिवसांत सरकार या आंदोलनावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.