Meenatai Thackeray Statue Red Colour: मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न; शिवसैनिक आक्रमक
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न; शिवसैनिक आक्रमक
Mumbai News: दादरच्या शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीकडून लाल रंग फेकण्याचा प्रयत्न झाला. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून पोलिस तपास सुरू आहे.
सायली मेमाणे
पुणे १७ सप्टेंबर २०२५ : मुंबईत पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या अर्धकृती पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीकडून लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार १६ सप्टेंबरच्या रात्री घडला असून सकाळी सहाच्या सुमारास या घटनेची माहिती समोर आली. ठाकरे कुटुंबीयांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या या पुतळ्यावर अशा प्रकारे रंग फेकल्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. घटनेनंतर लगेचच ठाकरे गटाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
मीनाताई ठाकरे या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी होत्या. त्यांचे निधन १९९५ मध्ये झाले होते. त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा शिवसेना कार्यकर्त्यांसाठी भावनिक आणि श्रद्धास्थान मानला जातो. त्यामुळे या पुतळ्यावर अशा प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले असून त्यात एका संशयित व्यक्तीचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्याच्याविरोधात शोधमोहीम सुरू असून तपास जलदगतीने सुरु आहे.
घटनेनंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले आणि संताप व्यक्त केला. पुतळ्यावरील लाल रंग काढण्याचे काम पोलिसांच्या उपस्थितीत तातडीने सुरू करण्यात आले. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त फौज तैनात केली आहे. तरीही शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. ठाकरे गटाने या घटनेचा निषेध केला असून सरकारवर कायदा-सुव्यवस्थेतील अपयशाचा आरोप केला आहे.
या प्रकरणावर खासदार अनिल देसाई यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, “कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजकंटक किंवा भेकडांच्या औलादीला कोणती संस्कृती, कोणते संस्कार झालेले नसतील. अशा प्रवृत्ती थांबवण्यासाठी पोलिस आणि शासनाने ठोस कारवाई करावी. आज जे काही चाललंय, त्यावरून सरकार अपयशी ठरले आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे घटनेला अधिक राजकीय रंग चढला आहे.
मुंबईत याआधीही अनेक वेळा नेत्यांच्या पुतळ्यांचे अवमान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र मीनाताई ठाकरे यांचा पुतळा हा ठाकरे कुटुंबीयांसाठी तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या घटनेनंतर आगामी काळात राजकारणात मोठे वादंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते आणि नेते या घटनेवर आक्रमक भूमिका घेत आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजवर आधारित तपास सुरू असून लवकरच आरोपी गजाआड होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र या प्रकारामुळे मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मीनाताई ठाकरे यांचा पुतळा हा केवळ स्मारक नसून ठाकरे गटासाठी एक श्रद्धास्थान आहे. त्यामुळे त्याचा अवमान होणे ही भावनिक तसेच राजकीय दृष्ट्या संवेदनशील बाब ठरली आहे. पुढील काही दिवसांत यावरून राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची चिन्हे आहेत.