Mega Block News: ‘या’ स्थानकांवर लोकल थांबणार नाही! रविवारी मध्य रेल्वेचा मोठा मेगाब्लॉक
Mega Block News: ‘या’ स्थानकांवर लोकल थांबणार नाही! रविवारी मध्य रेल्वेचा मोठा मेगाब्लॉक
Mumbai Local Mega Block News: मध्य रेल्वेकडून 18 जानेवारी 2026 रोजी मुंबई उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक. कोणती स्थानके बंद, कोणत्या लोकल रद्द, वेळा व पर्यायी सेवा सविस्तर वाचा.
पुणे १८ जानेवारी २०२५: मुंबईकरांसाठी रविवारी, 18 जानेवारी 2026 रोजी प्रवासाचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. मध्य रेल्वेकडून उपनगरीय मार्गांवर मोठा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला असून या काळात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामे केली जाणार आहेत. या मेगाब्लॉकचा परिणाम मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर होणार असून अनेक लोकल गाड्या रद्द, विलंबित किंवा वळवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत स्लो मार्गावरील लोकल गाड्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे काही लोकल सेवा रद्द करण्यात येणार असून काही गाड्या सुमारे 20 मिनिटे उशिराने धावतील. विशेष म्हणजे ब्लॉक काळात मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार या स्थानकांवर लोकल थांबणार नाही. जलद मार्गासाठी फलाट नसल्यामुळे या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागणार आहे.
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान (पोर्ट मार्गिका वगळून) अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत ब्लॉक असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, बेलापूर तसेच ठाणे ते पनवेल दरम्यानच्या अनेक लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. मात्र, प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशी-नेरुळ दरम्यान विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. उरण मार्गावरील लोकल सेवा मात्र उपलब्ध राहणार आहे.
ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे दरम्यान सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 या वेळेत लोकल सेवा रद्द करण्यात येणार असून ठाणे ते पनवेल या डाउन मार्गावरील लोकल सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 दरम्यान बंद राहतील. मात्र, ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील तसेच ठाणे ते वाशी व नेरुळ दरम्यान लोकल सेवा उपलब्ध असेल. बेलापूर, नेरुळ आणि उरण दरम्यान बंदर मार्गावरील लोकल सेवा सुरू राहणार आहे.
दरम्यान, ब्रिटिश काळात बांधलेल्या पूल क्रमांक 5 चे जुने गर्डर काढून नवीन गर्डर बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल दरम्यान सुमारे 13 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. याचबरोबर प्रभादेवी येथील रेल्वे उड्डाणपूल पाडण्याच्या कामासाठी डाउन स्लो मार्गावर साडेसात तासांचा ब्लॉक असणार आहे. या कामांमुळे अप आणि डाउन स्लो मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.
प्रवाशांनी या मेगाब्लॉकदरम्यान प्रवासाचे नियोजन आधीच करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. शक्यतो पर्यायी मार्ग, मेट्रो किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information