मुंबईत बेस्ट बस अपघात: प्लाझा बस स्टॉपवर पादचारी मृत, चार जखमी
मुंबईत बेस्ट बस अपघात: प्लाझा बस स्टॉपवर पादचारी मृत, चार जखमी
मुंबईत दादर प्लाझा बस स्टॉपजवळ भीषण बेस्ट बस अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलरने बसला धडक दिल्याने एका पादचार्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑक्टोबर २०२५ : मुंबईतील दादर परिसरात शनिवारी रात्री उशिरा (५ ऑक्टोबर) दादर प्लाझा बस स्टॉपजवळ भीषण अपघात घडला. भरधाव आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने जोरदार धडक दिल्याने बेस्ट बस अनियंत्रित झाली आणि बस स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांवर आदळली. या अपघातात शहाबुद्दीन (३७) नावाचा पादचारी जागीच ठार झाला, तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
बेस्ट बस क्रमांक MH01DR4654, रूट क्र. १६९, वरळी डेपोवरून प्रतिक्षानगर आगाराकडे परतत होती. दादर टी.टी.कडून शिवाजी पार्कच्या दिशेने येत असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक नियंत्रण गमावल्याने हा अपघात घडला. टेम्पोने बसच्या पुढील उजव्या टायराला जोरदार धडक दिली, ज्यामुळे बस डावीकडे झुकली आणि बस स्टॉपवरील प्रवाशांना चिरडत पुढे गेली.
या धडकेमुळे बसचा पुढील टायर फुटला आणि काच तुटली. टेम्पोने बसला धडकल्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या एका टॅक्सी आणि एका टूरिस्ट कारलाही धडक दिली. या दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
जखमी झालेल्यांमध्ये राहुल अशोक पडाले (३०), रोहित अशोक पडाले (३३), अक्षय अशोक पडाले (२५) आणि विद्या राहुल मोते (२८) यांचा समावेश आहे, ज्यात एका महिलेचा समावेश आहे. सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि टेम्पो ट्रॅव्हलर चालकाला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू असून, अपघाताची कारणे शोधली जात आहेत. या अपघातामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.