Mumbai Fraud: जुन्या नोटा-नाण्यांच्या नावाखाली 8 लाखांची फसवणूक

जुन्या नोटा-नाण्यांच्या नावाखाली 8 लाखांची फसवणूक
मुंबईत जुन्या नोटा आणि नाणी विकून पैसे मिळवण्याच्या आमिषाने 49 वर्षीय महिलेला 8 लाखांची फसवणूक झाली. पोलिसांत गुन्हा दाखल.
सायली मेमाणे
पुणे ७ ऑगस्ट २०२५ : मुंबईतील माझगाव परिसरात राहणाऱ्या ४९ वर्षीय महिलेला जुन्या नोटा आणि नाणी विकून मोठ्या कमाईचे आमिष दाखवून आठ लाख रुपयांना गंडविण्यात आले आहे. जुन्या नोटा आणि दुर्मीळ नाणी जमवण्याचा छंद असणाऱ्या अनेकांना अशा प्रकारच्या फसवणुकीचा धोका संभवतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पायधुनी येथील एका खासगी कार्यालयात काम करणाऱ्या महिलेने ऑनलाइन एका जाहिरातीतून “जुन्या नोटा व नाण्यांच्या बदल्यात लाखो रुपये मिळवा” असा संदेश पाहिला आणि त्या जाहिरातीतील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.
महिलेच्या ताब्यात ७८६ क्रमांक असलेली जुनी शंभर रुपयांची नोट आणि गेंड्याचे चित्र असलेले २५ पैशांचे जुने नाणे होते. यांचे प्रत्येकी सहा लाख, अशा एकूण १२ लाख रुपये मिळतील, असे सांगून आरोपीने तिला फसवले. राज गियानी नावाच्या तरुणाने नोट व नाण्याचा फोटो व्हॉट्सअॅपवर मागवून घेतला आणि व्यवहारासाठी विविध कारणांनी नोंदणी शुल्क, जीएसटी, प्रक्रिया शुल्क इत्यादींच्या नावाखाली महिलेने आठ लाख ४६ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले.
पण पैसे खात्यावर जमा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जेव्हा तिने राजशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा मोबाईल बंद आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या घटनेवरून स्पष्ट होते की जुन्या नोटा आणि नाण्यांच्या विक्रीच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी सक्रिय आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा जाहिरातींपासून सावध राहावे. अधिकृत आणि खात्रीशीर माध्यमांशिवाय कोणत्याही आर्थिक व्यवहारात गुंतू नये, अशी सूचना पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter