Mumbai News: मुंबई लोकलवरील सखोल अभ्यास अहवाल आयआयटीकडून शुक्रवारी प्रकाशित; तोटा, गर्दी आणि भविष्यातील उपायांवर प्रकाश

0
Mumbai News: मुंबई लोकलवरील सखोल अभ्यास अहवाल आयआयटीकडून शुक्रवारी प्रकाशित; तोटा, गर्दी आणि भविष्यातील उपायांवर प्रकाश

Mumbai News: मुंबई लोकलवरील सखोल अभ्यास अहवाल आयआयटीकडून शुक्रवारी प्रकाशित; तोटा, गर्दी आणि भविष्यातील उपायांवर प्रकाश

मुंबई लोकलचा तोटा कमी करणे, एसी लोकल भाडे, प्रवासी सुरक्षितता व क्षमता वाढ यावर आयआयटी मुंबईचा सविस्तर अभ्यास अहवाल शुक्रवारी जाहीर होणार आहे.

पुणे 2५ जानेवारी २०२६ : मुंबईची लोकल ही केवळ वाहतुकीचे साधन नसून मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गांवरून सुमारे ६८ ते ७० लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. वेगवान, किफायतशीर आणि विश्वासार्ह प्रवासासाठी लोकलला आजही पहिली पसंती दिली जाते. मात्र, वाढती गर्दी, अपघात, आर्थिक तोटा आणि पायाभूत सुविधांवरील ताण यामुळे लोकल व्यवस्थेच्या भविष्यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईने केलेला सखोल अभ्यास अहवाल शुक्रवारी प्रकाशित होणार आहे.

मुंबई लोकलचा एकूण अभ्यास करण्याचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) आयआयटी मुंबईला दिले होते. लोकल व्यवस्थेला दरवर्षी सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून हा तोटा कसा कमी करता येईल, यावर अहवालात महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आल्या आहेत. लोकलची वहन क्षमता वाढवणे, देखभाल खर्च कमी करणे, उत्पन्न वाढवण्याचे मार्ग, तसेच प्रवाशांच्या सोयी-सुविधा सुधारण्यावर या अभ्यासात भर देण्यात आला आहे.

सध्या सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरच्या वेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होते. या गर्दीमुळे लोकलमधून पडून किंवा रुळ ओलांडताना होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, सिग्नलिंग व्यवस्था, टर्मिनल क्षमतेच्या मर्यादा आणि ट्रेनच्या टर्नअराउंड वेळा यांचा सखोल विचार या अहवालात करण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून लोकल तिकिटांच्या दरात फारसा बदल झालेला नाही. मात्र, एसी लोकलचे भाडे सामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने त्याचा अपेक्षित वापर होत नाही. यामुळे एसी लोकलच्या तिकिट दरांची पुनर्रचना, खर्च आणि उत्पन्न यांचे संतुलन साधण्यासाठी व्यवहार्य आर्थिक मॉडेल तयार करण्याचा अभ्यास आयआयटीने केला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने सर्व लोकल एसी करण्याचा निर्णय घेतला जात असताना, त्याची आर्थिक आणि सामाजिक परिणामकारकता या अहवालात मांडण्यात आली आहे.

मुंबई महानगरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी रेल्वे, मेट्रो आणि बेस्टसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली राबवली जात आहे. या प्रणालीची व्यवहार्यता, प्रवाशांना होणारे फायदे आणि अंमलबजावणीतील अडचणी यांचाही अभ्यास या अहवालात करण्यात आला आहे. या संपूर्ण संशोधनासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा खर्च आला असून, १६ स्वतंत्र संशोधन पेपर्सच्या माध्यमातून विविध आयामांचा अभ्यास करण्यात आला आहे.

भविष्यातील मेट्रो प्रकल्प, लोकल मार्गांचा विस्तार आणि नव्या रेल्वे मार्गांनंतर प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी कोणत्या टप्प्याटप्प्याने योजना राबवाव्यात, वेळापत्रकात कसे बदल करावेत आणि पायाभूत सुविधा कशा विकसित कराव्यात, याबाबत कालबद्ध शिफारसी आयआयटीने एमआरव्हीसीला केल्या आहेत. ट्रेनचा वापर, वक्तशीरपणा, मालमत्तेचा वापर, देखभाल पद्धती, कर्मचारी भरती आणि ऊर्जेचा वापर यांचेही सविस्तर मूल्यांकन या अहवालात समाविष्ट आहे. हा अहवाल मुंबई लोकलच्या भविष्यातील धोरण आणि गुंतवणूक निर्णयांना महत्त्वपूर्ण दिशा देणारा ठरणार आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *