Mumbra News: मुंब्र्यात इमारतीचा स्लॅब कोसळला 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, 5 जणांची सुखरूप सुटका

Mumbra News: मुंब्र्यात इमारतीचा स्लॅब कोसळला 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, 5 जणांची सुखरूप सुटका
मुंब्र्यातील अमृतनगर परिसरातील जुन्या इमारतीचा गॅलरी स्लॅब कोसळून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. पाच जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून इमारत रिकामी करण्यात आली आहे.
पुणे २८ जुलै २०२६ : मुंब्र्यातील अमृतनगर परिसरात जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत एकूण सहा जण स्लॅबखाली अडकले होते. बचाव पथकाने तातडीने कारवाई करत सर्वांना बाहेर काढले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या 13 वर्षीय आस्मा कादर शेख हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित पाच जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून प्रशासनाने इमारत तातडीने रिकामी केली आहे.
ही दुर्घटना 27 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.16 वाजण्याच्या सुमारास जनता बेकरीजवळील दर्गा गल्ली, अमृतनगर, मुंब्रा येथे घडली. फैय्याज अपार्टमेंट या तळमजला अधिक चार मजली आणि सुमारे 38 वर्षे जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब अचानक कोसळून तो पहिल्या मजल्यावर पडला. घटनेच्या वेळी इमारतीत राहणाऱ्या काही रहिवाशांवर स्लॅबचा मलबा कोसळल्याने सहा जण अडकले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष, टीडीआरएफ, पोलीस आणि टोरंट पॉवरच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्यात आले आणि अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या आस्मा कादर शेख हिला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
या दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने फैय्याज अपार्टमेंट ही इमारत पूर्णपणे रिकामी करण्याचा निर्णय घेतला. इमारतीत राहणाऱ्या सुमारे 70 ते 80 रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 78 आणि 123 येथे करण्यात येत आहे. रहिवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत इमारतीची संरचनात्मक तपासणी करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
मुंब्रा आणि ठाणे परिसरात जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न वारंवार समोर येत आहे. पावसाळ्यात अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनतो. त्यामुळे धोकादायक इमारतींचे वेळेवर सर्वेक्षण, संरचनात्मक लेखापरीक्षण आणि आवश्यक त्या दुरुस्ती किंवा पुनर्विकासाची प्रक्रिया गतीने राबविण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. स्लॅब कोसळण्यामागील नेमके कारण, इमारतीची संरचनात्मक स्थिती आणि आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास प्रशासन करत आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare