नवले पूल–सिंहगड रस्ता परिसरात सांडपाणी झाकणं तुटली, पाणी साचून अपघातांचा धोका वाढला

0
नवले पूल–सिंहगड रस्ता परिसरात सांडपाणी झाकणं तुटली, पाणी साचून अपघातांचा धोका वाढला

नवले पूल–सिंहगड रस्ता परिसरात सांडपाणी झाकणं तुटली, पाणी साचून अपघातांचा धोका वाढला

पुण्यातील नवले पूल ते सिंहगड रस्ता परिसरात सेवा रस्त्यावर सांडपाणी वाहिनीची झाकणं तुटल्याने खड्डे व पाणी साचले आहे. पथदिवे बंद, बेकायदा पार्किंग आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांत नाराजी. अपघातांची मालिका रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.

सायली मेमाणे

खडकवासला १२ सप्टेंबर २०२५ :: पुण्यातील नवले पूल ते सिंहगड रस्ता या परिसरात सेवा रस्त्यालगतची परिस्थिती गंभीर बनली आहे. आशीर्वाद हॉटेल ते विश्वास हॉटेल (डी-व्हिस्टेरिया सोसायटी) दरम्यान सांडपाणी वाहिनीवरील अनेक सिमेंटची झाकणं तुटल्याने रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाचे पाणी वाहून न जाता रस्त्यावर साचून राहत असल्याने वाहनचालकांना मोठा अडथळा येत असून अपघातांची शक्यता वाढली आहे.

या भागात पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत, परिणामी रात्री संपूर्ण परिसर अंधारमय होतो. अंधाराचा फायदा घेत बेकायदा ट्रक, टेम्पो व बस पार्किंग महामार्गालगत केले जाते. त्यामुळे रस्त्याचा मोठा भाग अडवल्याने केवळ पाच ते सहा फूट रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध राहतो. यामुळे वाहतूक कोंडी तीव्र होत असून प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला आहे.

पाण्याचे साचलेले तलावसदृश स्वरूप फक्त वाहतुकीलाच नाही तर आरोग्यालाही धोका निर्माण करत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागतो आहे. स्थानिक रहिवासी प्रशासनाच्या निष्क्रीय भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.

माजी नगरसेवक हरिदास चरवड यांनी सांगितले की, नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरू आहे आणि आतापर्यंत शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. याबाबत वेळोवेळी निवेदने दिली असूनही ठोस कार्यवाही झाली नसल्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण वारजे विभागीय कार्यालय, पुणे महापालिका आयुक्त, पथ विभाग, विद्युत विभाग आणि मलनिस्सारण विभाग यांच्याकडे तक्रारी व निवेदने दिली आहेत. नागरिकांची अपेक्षा आहे की अपघात टाळण्यासाठी तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवून झाकणं दुरुस्त करण्यात यावीत, पाणी निचऱ्याची व्यवस्था केली जावी, तसेच पथदिवे सुरू करून बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी.

दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहेत. नवले पूल आणि सिंहगड रस्त्यावरील ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारली नाही, तर वाहतूक कोंडीसोबतच नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed