नवी मुंबई विमानतळ जमीन वाद: बिवलकरांचा रोहित पवारांविरोधात १००० कोटींचा मानहानीचा दावा

0
नवी मुंबई विमानतळ जमीन वाद: बिवलकरांचा रोहित पवारांविरोधात १००० कोटींचा मानहानीचा दावा

नवी मुंबई विमानतळ जमीन वाद: बिवलकरांचा रोहित पवारांविरोधात १००० कोटींचा मानहानीचा दावा

नवी मुंबई विमानतळाजवळील बिवलकरांच्या जमिनीच्या वादात बिवलकरांनी रोहित पवारांविरोधात १००० कोटींचा मानहानीचा दावा ठोठावला; पत्रकार परिषदेत त्यांनी आपली बाजू मांडली.

सायली मेमाणे

पुणे १० सप्टेंबर २०२५ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील बिवलकरांच्या जमिनीचा वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. रोहित पवारांनी या जमिनीवर सिडकोने नियमबाह्य पद्धतीने बिवलकर कुटुंबियांना फायदा दिला असल्याचा आरोप केला होता. तसेच, देश सोडण्यापूर्वी बिवलकरांना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. या आरोपांनंतर बिवलकरांनी रोहित पवारांना आव्हान दिले आहे आणि आपली जमीन हक्काची असल्याचे स्पष्ट केले.

बिवलकरांनी मंगळवारी वाशीत पत्रकार परिषद घेत आपल्या बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, “मी रणछोडदास नसून, आमची हक्काची जमीन आहे. मी चोरी केलेली नाही.” या वेळी त्यांचे वकील तन्वीर निझामही उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात आम्ही देखील एसआयटीची मागणी करत आहोत. बिवलकरांना त्रास देणाऱ्यांत जमिनी हडपणारा समूह सामील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उर्मिष उधाणी, के. कुमार, भावना घाणेकर आणि एक पत्रकार यांचा या पद्धतीत सहभाग असल्याचे बिवलकरांनी नमूद केले.

बिवलकरांच्या वकीलांनी सांगितले की, सिडकोमधून विकासकांना दिलेल्या भूखंडांची माहिती काँशियस फोरम संस्थेचे के. कुमार माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळवतात. ही माहिती उधाणींना दिली जाते आणि त्या जमिनीत लेटिगेशन तयार करून विकासकांना त्रास दिला जातो. वन विभागाकडून कारवाईसाठी तक्रारी केल्या जातात. अशा पद्धतीने सध्या बिवलकर प्रकरणातही कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बिवलकरांनी रोहित पवारांविरोधात १००० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचेही सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “रोहित पवार सातत्याने माझी व कुटुंबियांची बदनामी करत आहेत. माझ्या नावावर एकही एनसी नाही. ही जमीन राघोजी आंग्रे यांच्याकडून इनाम स्वरूपात मिळाली होती आणि ब्रिटिशांनी ताब्यात घेतल्यावर आम्ही लंडनच्या सुप्रीम कोर्टात लढून ती परत मिळवली. आमचा खोटा इतिहास सांगितला गेला.”

बिवलकरांनी शरद पवारांची बाजू घेत सांगितले की, “मी जयंत टिळकांसोबत शरद पवारांना भेटलो आहे, मात्र कामासाठी मी कधी गेलो नाही. पवारांना बिवलकरांचा इतिहास चांगलाच माहित आहे. रोहित पवारांनी आरोप करताना निदान आजोबांना तरी विचारायला हवे होते.”

या घटनेने नवी मुंबई विमानतळाजवळील जमीन वाद पुन्हा एकदा चर्चेत आणला असून, बिवलकरांनी आपल्या हक्काचे स्पष्टपणे समर्थन केले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी दाखवले की, जमिनीच्या हक्कासाठी आणि बदनामीवर उपाय करण्यासाठी ते सर्व कायदेशीर मार्गांचा वापर करतील. भविष्यात या प्रकरणावर काय न्यायालयीन कारवाई होईल, हे पुढील काळात स्पष्ट होईल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed