NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात नागपूर कनेक्शन CBI च्या रडारवर ‘मास्टरमाईंड’ आलोक

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात नागपूर कनेक्शन CBI च्या रडारवर ‘मास्टरमाईंड’ आलोक
NEET-UG 2026 पेपरफुटी घोटाळ्यात नागपूर कनेक्शन उघड. CBI च्या तपासात आलोक नावाचा संशयित मास्टरमाईंड समोर. विद्यार्थ्यांना पुण्यात बोलावून ५ लाखांत पेपर विक्रीचा धक्कादायक खुलासा.
पुणे २० मे २०२६ : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात आता नागपूर कनेक्शन समोर आल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासात आलोक नावाचा एक संशयित मास्टरमाईंड रडारवर आला असून, त्याने देशभरातील विशेषतः महाराष्ट्रातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात विद्यार्थ्यांना थेट किंवा दलालांच्या माध्यमातून पेपर विक्री केल्याचे धागेदोरे समोर येत आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पुण्यात बोलावून घेण्यात आले होते, ही बाब तपासात उघड झाली आहे.
CBI च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड पॅटर्न तपासताना नागपूरचा धागा समोर आला. मुंबईतील CBI महानिरीक्षक हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे CBI चे तपासप्रमुख विनोद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये अलीकडेच छापे टाकण्यात आले होते. या कारवाईदरम्यान नांदेडमधील एका हॉटेल व्यावसायिक कुटुंबाची चौकशी करण्यात आली. या चौकशीत आलोकचे नाव प्रथमच समोर आले, ज्यामुळे तपास यंत्रणांनी नागपूरकडे आपले लक्ष वळवले.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या विद्युतनगर भागातील अश्विनी कदम या महिलेने आपल्या मुलीसाठी तब्बल ५ लाख रुपयांना NEET चा पेपर खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सुरुवातीला २५ हजार रुपये ऑनलाईन टोकन मनी म्हणून देण्यात आले होते. त्यानंतर आलोकने संबंधित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना पुण्यात एका ठिकाणी १५ दिवस थांबवून ठेवले. या कालावधीत तिला प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका देण्यात आल्याची माहिती CBI च्या तपासात समोर आली आहे.
या रॅकेटची कार्यपद्धती अत्यंत योजनाबद्ध आणि गोपनीय स्वरूपाची होती, असे प्राथमिक तपासात दिसून येते. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शहरांतून पुण्यात बोलावून, तिथे काही दिवस ठेवून प्रश्नपत्रिका दिली जात होती. यात पालकांचीही थेट सहभाग असल्याचे संकेत मिळत आहेत. या प्रकरणात दलालांची साखळी कार्यरत होती का, याचाही तपास CBI करत आहे. एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा संशय असल्याने हा घोटाळा देशव्यापी पातळीवर पसरल्याचे स्पष्ट होते.
या प्रकरणामुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे परीक्षा देत असताना अशा प्रकारे पैशांच्या जोरावर पेपर विक्री होणे ही शिक्षण व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. CBI या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, यात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. नागपूर, पुणे आणि नांदेड या शहरांदरम्यानचे कनेक्शन उलगडत असताना या रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare