PCMC News: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा निविदांवर वाद संदीप वाघेरे यांची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा निविदांवर वाद; संदीप वाघेरे यांची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या जलकुंभ परिचालन व देखभाल निविदांवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आक्षेप घेत प्रक्रिया रद्द करून नव्याने पारदर्शक निविदा काढण्याची मागणी केली आहे.
पुणे २२ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील जलकुंभांचे परिचालन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी या निविदांमधील अटी आणि शर्तींवर गंभीर आक्षेप घेत, त्या काही ठराविक ठेकेदारांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. यामुळे सद्याची निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करून सुधारित आणि पारदर्शक अटींसह नव्याने निविदा काढाव्यात, अशी मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्ध केलेल्या निविदा क्रमांक पाणीपुरवठा/HO/2/39/2026-2027 आणि पाणीपुरवठा/HO/3/2/2026-2027 यामधील अनेक अटी स्पर्धाविरोधी असल्याचा दावा वाघेरे यांनी केला आहे. त्यांच्या मते, या अटींमुळे निविदा प्रक्रियेत पारदर्शकता कमी होत असून काही मोजक्या ठेकेदारांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संदीप वाघेरे यांनी केलेल्या आरोपांनुसार, निविदेतील अटींमुळे सुशिक्षित बेरोजगार, स्वयंरोजगार गट आणि सेवा सहकारी संस्थांना प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी होणे कठीण होत आहे. परिणामी स्पर्धा मर्यादित होत असून काही निवडक कंत्राटदारांनाच संधी मिळण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याशिवाय, प्रत्यक्षात जलकुंभांवरील व्हॉल्व ऑपरेशन आणि किरकोळ देखभाल-दुरुस्तीचे काम असताना त्याला ‘परिचालन’ अशी व्यापक संज्ञा देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या शब्दप्रयोगामुळे अनुभवासह इतर पात्रतेच्या अटी अधिक कठोर झाल्या असून, अनेक इच्छुक कंत्राटदार आणि संस्थांना प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक वाघेरे यांनी अकुशल कामगारांसाठी अनुभव प्रमाणपत्राची सक्तीही अन्यायकारक असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. अशा स्वरूपाच्या कामासाठी अनुभवाची सक्ती करणे व्यवहार्य नसल्याचे सांगत त्यांनी ही अट तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच ‘परिचालन’ या व्यापक अनुभवाऐवजी ‘व्हॉल्व ऑपरेशन’शी संबंधित अनुभव ग्राह्य धरण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्यात यावी, निविदांमधील वादग्रस्त अटी रद्द कराव्यात आणि स्पर्धात्मक व पारदर्शक निकषांसह नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. या मागणीमुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर आणि निविदा प्रक्रियेवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत नुकतेच 272 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा विभागातील निविदा वादामुळे प्रशासनाची भूमिका काय राहणार आणि निविदा प्रक्रियेत कोणते बदल केले जाणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare