Pune Crime: चित्रपट निर्मात्याने चिनी नागरिकाच्या मदतीने केली 86 लाखांची सायबर फसवणूक, अटक
चित्रपट निर्मात्याने चिनी नागरिकाच्या मदतीने केली 86 लाखांची सायबर फसवणूक, अटक
पुण्यातील एका कथित चित्रपट निर्मात्याला चिनी नागरिकाच्या मदतीने 86 लाखांहून अधिक रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी अटक. आरोपीकडून मोबाईल व कागदपत्रे जप्त; पिंपरी चिंचवड सायबर पोलीस तपासात.
सायली मेमाणे
पुणे २९ जुलै २०२५ : Pune Crime: पुण्यातील सायबर गुन्ह्यांमध्ये आणखी एका मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. एका कथित चित्रपट निर्मात्याने चिनी नागरिकाच्या मदतीने सायबर फसवणुकीचा कट रचल्याचे समोर आले असून, पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव शिवम बाळकृष्ण संवतसरकार असून तो पुण्याचा रहिवासी आहे. पोलिस तपासानुसार, आरोपीने चीनमधील बॉम्बिनी नावाच्या नागरिकाशी थेट संपर्क साधून बालाजी इंटरप्राइजेस या नावाने बँक खाते सुरू केले होते. या खात्याचा वापर सायबर फसवणुकीसाठी केला गेला.
या खात्यावर आतापर्यंत 86 लाख 43 हजार 111 रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, या एकाच खात्याशी संबंधित किमान 15 वेगवेगळ्या फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आरोपीकडे आणखी दोन बँक खाती असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली असून, त्याचे तपशील आरोपीच्या मोबाईलमध्ये आढळले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून दोन मोबाईल फोन व काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असून, त्याचा सखोल तपास सुरू आहे.
सायबर पोलिसांच्या तपासात आरोपीने ऑनलाइन फ्रॉडसाठी चिनी नागरिकांच्या सांगण्यावरून बँक खाती सुरू करून वापर केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या फसवणुकीचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय सायबर गँगपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपीच्या सहभागामुळे मोठ्या प्रमाणावर पैसे एका खात्यावर जमा झाले असून, पोलिस आता त्या पैशांचा प्रवास ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणामुळे सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चिनी नागरिकाशी संबंधित इतर व्यक्तींचाही तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांकडे असून, आणखी आरोपींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करताना अधिक सजग राहण्याचे आवाहन केले आहे.