पुणे ड्रोन शो, मोदी वाढदिवस कार्यक्रम, नरेंद्र मोदी पुणे, मोदींचा अमृत महोत्सवी वाढदिवस, भाजप उपक्रम पुणे
पुणे ड्रोन शो, मोदी वाढदिवस कार्यक्रम, नरेंद्र मोदी पुणे, मोदींचा अमृत महोत्सवी वाढदिवस, भाजप उपक्रम पुणे
PM नरेंद्र मोदींच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पुण्यात महाराष्ट्रातील पहिलाच ड्रोन शो! हजारो ड्रोन्स आकाशात झेपावून ‘विकसित भारत’चा संदेश देणार. दिव्यांग शिबीर, अवधूत गुप्ते यांचा कॉन्सर्ट आणि ७५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग.
सायली मेमाणे
पुणे १७ सप्टेंबर २०२५ : Pune Drone Show : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पुणेकरांसाठी एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रात प्रथमच पुण्यात भव्य ड्रोन शो रंगणार असून तो १७ सप्टेंबर रोजी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने हा शो आयोजित करण्यात आला आहे. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा पहिला ड्रोन शो ठरणार आहे. या उपक्रमामुळे भाजप कार्यकर्ते आणि पुणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘ज्योतीने तेजाची आरती’ या ड्रोन शोद्वारे शुभेच्छा अर्पण केल्या जाणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हजारो ड्रोन आकाशात झेपावतील आणि विविध फॉर्मेशन्समधून विकसित भारताच्या प्रवासाचे दर्शन घडवतील. या शोची खासियत म्हणजे ३ ते ४ किलोमीटर परिसरातील नागरिकांना हा भव्य सोहळा आकाशातून पाहता येणार आहे. थ्रीडी स्वरूपात असलेला हा शो तब्बल ४५ मिनिटांचा असेल. त्यामध्ये मोदी सरकारची कामगिरी, पुण्याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव आणि विकसित भारताची संकल्पना दृश्यरूपाने मांडली जाईल.
या दिवशी केवळ ड्रोन शोच नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत दिव्यांग सहाय्यता शिबीर होणार असून यात १२०० हून अधिक दिव्यांगांना १७५० आवश्यक साहित्यांचे मोफत वितरण केले जाईल. यानंतर संध्याकाळी ५ ते १० वाजेपर्यंत ख्यातनाम गायक अवधूत गुप्ते यांचा लाईव्ह कॉन्सर्ट रंगणार आहे. यामध्ये संगीताच्या मैफिलीतून नागरिकांना आनंद मिळणार असून रात्री ८ वाजता ऐतिहासिक ड्रोन शो या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
मोहोळ यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी गेल्या अकरा वर्षांत राष्ट्रहिताला सर्वोच्च मानून देशाला वेगळी दिशा दिली आहे. २६ मे २०१४ रोजी संसदेच्या पायरीवर नतमस्तक झाल्यापासून मोदींनी सामान्य जनतेच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणली आहे. करोनाकाळात मोफत लसीकरण करून लाखो लोकांचे जीव वाचवले, नवीन अवकाश धोरण राबवले, आफ्रिकेसह अनेक लहान देशांना मदतीचा हात दिला, तसेच पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात ठाम पवित्रा घेतला. मोदींनी दिलेला ‘मै देश को झुकने नहीं दुंगा’ हा मंत्र आजही देशवासीयांसाठी प्रेरणादायी ठरतो.
या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या औचित्याने पुण्यातील ७५ हजार विद्यार्थी पंतप्रधानांना शुभेच्छा देणार आहेत. विविध शाळांतील विद्यार्थी पोस्टकार्डद्वारे आपले संदेश लिहून पंतप्रधान कार्यालयात पाठवणार आहेत. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागातून मोदींविषयी असलेले आदर आणि प्रेम दर्शवणारा ठरणार आहे.
या सर्व उपक्रमांमधून केवळ वाढदिवसाचा सोहळा नव्हे तर विकसित भारताच्या स्वप्नाची जाणीव नागरिकांना करून दिली जाणार आहे. हजारो ड्रोनच्या झेपेमुळे पुण्याचे आकाश उजळून निघणार असून पुणेकर या अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सादर होणारा हा अनोखा कार्यक्रम देशवासीयांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.