Pune News: बारामतीत मोठी राजकीय हालचाल; शरद पवार–अजित पवार एकत्र, पुढील निवडणुकांबाबत मोठी घोषणा

Pune News: बारामतीत मोठी राजकीय हालचाल; शरद पवार–अजित पवार एकत्र, पुढील निवडणुकांबाबत मोठी घोषणा
महापालिका निकालानंतर बारामतीत शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवण्याची मोठी घोषणा केली.
पुणे १७ जानेवारी २०२६ : महाराष्ट्राच्या राजकारणात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये हालचाली वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. या पार्श्वभूमीवर निकालानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते.
महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळवलेला दणदणीत विजय हा शरद पवार आणि अजित पवार दोघांसाठीही मोठा धक्का मानला जात आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या या शहरांमध्ये सत्ता गमावल्यामुळे पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत गंभीर विचारमंथन सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीतील ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
बारामतीत सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने गोविंद बाग येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सर्वात मोठी घोषणा करत आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र लढवणार असल्याचे स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकांतील पराभवाचे आत्मपरीक्षण करून पुढील राजकीय वाटचाल ठरवली जाईल, असेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याबाबत कोणतीही ठोस चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीदेखील, निवडणुका एकत्र लढवण्याच्या घोषणेमुळे दोन्ही गटांमध्ये समन्वय वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, बारामतीत सुरू असलेल्या ‘कृषीक 2026’ या कृषी प्रात्यक्षिकांवर आधारित प्रदर्शनामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. 17 ते 24 जानेवारीदरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती.
पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. महापालिका निवडणुकांतील पराभवानंतर निर्माण झालेली मरगळ दूर करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकदीने उतरायचा निर्धार या भेटीतून दिसून येतो. त्यामुळे बारामतीतील ही घडामोड केवळ एक भेट न राहता महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील दिशा ठरवणारी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare