पुणे रेल्वे स्टेशनवर जबरी चोरीचा प्रयत्न, बंडगार्डन पोलिसांची जलद कारवाई; दोन आरोपी जेरबंद
पुणे रेल्वे स्टेशनवर जबरी चोरीचा प्रयत्न, बंडगार्डन पोलिसांची जलद कारवाई; दोन आरोपी जेरबंद
पुणे रेल्वे स्टेशनवर तीन इसमांनी दारू पिण्यासाठी पैसे मागत फिर्यादीवर हल्ला केला. बंडगार्डन पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास लोहमार्ग पोलिसांकडे सुरू आहे.
सायली मेमाणे
पुणे १८ सप्टेंबर २०२५ : पुणे शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या प्रयत्नाचा तपास करत बंडगार्डन पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. फिर्यादी हे रेल्वे स्टेशनवरील फ्लॅटफॉर्म क्रमांक ०१ आणि ०२ वर थांबले असताना तीन अनोळखी इसम त्यांच्याकडे आले. त्यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, फिर्यादीने त्यांना नकार दिल्यानंतर या इसमांनी अचानक शिवीगाळ सुरू केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने पोटावर आणि हातावर वार करून फिर्यादीस गंभीर जखमी केले.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात भा. दं. सं. कलमानुसार जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ पुणे शहर श्री. मिलींद मोहिते यांनी विशेष तपास पथक नियुक्त केले होते.
तपासादरम्यान पोलीस अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे महेश अंबादासजी फोटजावरे (वय १९, रा. पुणे स्टेशन फिरस्ता) आणि प्रसाद दत्तू कांबळे (वय २७, रा. पुणे स्टेशन फिरस्ता) अशी त्यांची नावे आहेत. अटकेनंतर त्यांना पुढील तपासासाठी पुणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या संपूर्ण कारवाईत पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, प्रदीप शितोळे, सारस साळवी, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे आणि शिवाजी सरक यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, उप आयुक्त श्री. मिलींद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग श्रीमती संगिता आल्फान्सो शिंदे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या घटनेनंतर रेल्वे स्टेशन परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागरिकांना पहाटे व रात्रीच्या वेळी स्टेशन परिसरात सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपी अल्पावधीतच पकडले गेले असून, तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.