R Ashwin Retirement: आर. अश्विनची IPL मधून निवृत्ती, 16 वर्षांच्या प्रवासाला पूर्णविराम

0
R Ashwin Retirement: आर. अश्विनची IPL मधून निवृत्ती, 16 वर्षांच्या प्रवासाला पूर्णविराम

R Ashwin Retirement: आर. अश्विनची IPL मधून निवृत्ती, 16 वर्षांच्या प्रवासाला पूर्णविराम

भारतीय फिरकीपटू आर. अश्विनने IPL मधून निवृत्तीची घोषणा केली. 16 वर्षांत 221 सामने खेळून 187 बळी मिळवले. CSK पासून राजस्थान रॉयल्सपर्यंत 5 संघांचे प्रतिनिधित्व केले.

सायली मेमाणे

पुणे २७ ऑगस्ट २०२५ : भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फिरकीपटू आर. अश्विनने आज आयपीएलमधून (IPL) निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना मोठं धक्का दिला आहे. डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही महिन्यांतच त्याने आयपीएललाही रामराम ठोकला आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत हा निर्णय अधिकृत केला. “आज माझा आयपीएल क्रिकेटर म्हणून प्रवास संपतो, पण आता एका नव्या इनिंगची सुरुवात होतेय,” असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

अश्विनचा आयपीएल प्रवास 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून सुरू झाला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याने जलद गतीने नाव कमावले. नंतर रायझिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व केल्यानंतर तो पुन्हा 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडे परतला. या प्रवासात त्याने एकूण 221 सामने खेळून 187 बळी घेतले. त्याच्या कामगिरीतून आयपीएलमधील सातत्य आणि फलंदाजांना गोंधळात टाकणाऱ्या फिरकीची झलक दिसून आली.

चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळताना त्याने 106 सामन्यांत 97 बळी घेतले. रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी 14 सामन्यांत 10 बळी, पंजाब किंग्जसाठी 28 सामन्यांत 25 बळी, दिल्ली कॅपिटल्ससाठी 28 सामन्यांत 20 बळी, तर राजस्थान रॉयल्ससाठी 45 सामन्यांत 35 बळी मिळवले. मागील हंगामात (आयपीएल 2025) तो सीएसकेकडून 9 सामने खेळला आणि 7 बळी मिळवले. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने तो आयपीएलमधील सर्वात विश्वासार्ह स्पिनर म्हणून ओळखला जात राहिला.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर अश्विनने 106 कसोटी, 116 एकदिवसीय आणि 65 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत 537 विकेट्ससह तो भारताचा सर्वात यशस्वी फिरकीपटूंमध्ये गणला जातो. एकदिवसीय सामन्यांत 156 आणि टी-20 मध्ये 72 विकेट्स घेऊन त्याने आपली छाप सोडली आहे.

निवृत्ती जाहीर करताना अश्विनने आपल्या पोस्टमध्ये सर्व फ्रँचायझींचे, बीसीसीआयचे आणि आयपीएलचे आभार मानले. त्याने लिहिले, “गेल्या काही वर्षांत मिळालेल्या आठवणी आणि अनुभव अविस्मरणीय आहेत. हा शेवट नाही, तर एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. मी वेगवेगळ्या लीगमध्ये खेळाचा शोध घेण्यासाठी आणि स्वतःला नवीन स्वरूपात आजमावण्यासाठी उत्सुक आहे.”

अश्विनच्या या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. चाहत्यांसाठी तो केवळ एक खेळाडू नव्हता, तर एक रणनीतिकार आणि संघाला विजयाच्या दिशेने नेणारा खेळाडू होता. त्याची कारकीर्द भारतीय क्रिकेटसाठी तसेच आयपीएलसाठी एक प्रेरणादायी प्रवास ठरली आहे.

आता अश्विन क्रिकेटच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाला असून, तो पुढे कोणत्या लीगमध्ये किंवा कोणत्या भूमिकेत दिसतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच्या निवृत्तीमुळे आयपीएलने एक विश्वासार्ह फिरकीपटू गमावला आहे, मात्र चाहत्यांना त्याच्या नव्या प्रवासाची उत्सुकता आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed