Sameer Wankhede vs Red Chillies Entertainment: समीर वानखेडेंचा संताप! ‘वेब सिरीज ही माझ्या बदनामीसाठीचा कट’, कोर्टात जोरदार युक्तीवाद

0
समीर वानखेडेंचा संताप! ‘वेब सिरीज ही माझ्या बदनामीसाठीचा कट’, कोर्टात जोरदार युक्तीवाद

समीर वानखेडेंचा संताप! ‘वेब सिरीज ही माझ्या बदनामीसाठीचा कट’, कोर्टात जोरदार युक्तीवाद

IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात रेड चिलीज एंटरटेनमेंटवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यांनी आरोप केला की वेब सिरीज त्यांच्या बदनामीसाठी बनवली असून ती ‘कलात्मक अभिव्यक्ती’ नसून सूडबुद्धीने प्रेरित आहे.

सायली मेमाणे

पुणे १ नोव्हेंबर २०२५ : दिल्ली उच्च न्यायालयात सुरु असलेल्या मानहानीच्या खटल्यात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडवर गंभीर आरोप करत जोरदार युक्तीवाद केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ही वेब सिरीज ‘कलात्मक अभिव्यक्ती’ नसून त्यांच्या बदनामीसाठी रचलेला एक सुनियोजित हल्ला आहे. रेड चिलीजने दिलेलं उत्तर पूर्णपणे खोट्या आणि भ्रामक बाबींवर आधारित असल्याने ते फेटाळून लावावे, अशी मागणीही त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.

वानखेडे यांनी कोर्टाला सांगितलं की रेड चिलीजद्वारे तयार केलेली बदनामीकारक सिरीज इंटरनेटवर वेगाने पसरत आहे, ज्यामुळे एका सन्मानित सरकारी अधिकाऱ्याच्या प्रतिमेला आणि वैयक्तिक आयुष्याला हानी पोहोचत आहे. हे थांबवले नाही, तर होणारे नुकसान अपूरणीय असेल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांनी म्हटलं की, रेड चिलीज कंपनी ‘कलात्मक अभिव्यक्ती’च्या नावाखाली गैरकृत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या मते, या वेब सिरीजचा हेतू प्रेक्षकांचे मनोरंजन नसून एका अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का देणे आणि व्यावसायिक फायदा मिळवणे हा आहे.

वानखेडे यांनी असा दावा केला की रेड चिलीजने त्यांच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी एका प्रलंबित सीबीआय एफआयआरचा चुकीचा वापर केला. त्यांनी स्पष्ट केलं की केवळ एफआयआर दाखल होणे म्हणजे दोष सिद्ध होणे नव्हे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत निर्दोषतेचा सिद्धांत हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यांनी युक्तिवाद केला की, जर भ्रष्टाचाराचे आरोप खरे असतील तर लाच देणारे लोकसुद्धा तितकेच दोषी आहेत. रेड चिलीज एकाच कायद्यानुसार स्वतःचा बचाव आणि माझ्यावर हल्ला दोन्ही करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

या सिरीजबद्दल वानखेडे म्हणाले की ती व्यंग नाही, तर थेट त्यांच्या जीवनावर आधारित आहे. सिरीजमधील पात्राचं बोलणं, हावभाव, शरीराची ठेवण आणि कार्यशैली त्यांच्या सारखी आहे. त्या पात्राने एका प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्याला अटक केली आहे, जी थेट आर्यन खान प्रकरणाशी मिळतीजुळती आहे. त्यांनी सांगितले की सिरीजमधील पात्र वारंवार “सत्यमेव जयते” या राष्ट्रीय आदर्श वाक्याचा उपहासात्मक वापर करते — जे वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणाच्या तपासादरम्यान माध्यमांशी बोलताना वापरले होते. अशा प्रकारे राष्ट्रीय आदर्श वाक्याचा उपहास हा विनोद किंवा कलात्मक स्वातंत्र्य म्हणता येत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

वानखेडे यांनी कोर्टाकडे तात्काळ interim injunction जारी करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे सिरीजचे पुढील प्रसारण थांबवले जाईल. त्यांनी सांगितले की, जर सिरीजवर त्वरित बंदी आणली नाही, तर सार्वजनिक स्तरावर त्यांच्या प्रतिमेचे नुकसान अपरिवर्तनीय राहील. या संपूर्ण वादावरून वानखेडे आणि रेड चिलीज यांच्यातील संघर्ष आता न्यायालयीन टप्प्यावर गेला आहे. हे प्रकरण केवळ एका अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेचे नव्हे, तर मनोरंजन उद्योगातील जबाबदारीच्या मर्यादांचेही एक महत्त्वाचे उदाहरण बनू शकते.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed