Washim News: महिला सरपंच सुनीता मिटकरी यांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यास लाल किल्ल्यावर खास आमंत्रण
Washim News: महिला सरपंच सुनीता मिटकरी यांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यास लाल किल्ल्यावर खास आमंत्रण
वाशीमच्या ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता मिटकरी यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन सोहळ्यास दिल्लीतील लाल किल्ल्यावर विशेष आमंत्रण. ग्रामविकासातील त्यांच्या कार्याची दखल.
सायली मेमाणे
पुणे ११ ऑगस्ट २०२५ : वाशीम जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत ढोरखेडा येथील महिला सरपंच सुनीता दत्तात्रय मिटकरी यांना यंदाच्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन सोहळ्यास दिल्लीतील लाल किल्ल्यावर उपस्थित राहण्यासाठी ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाकडून विशेष आमंत्रण मिळाले आहे. राज्यातील फक्त 17 जिल्ह्यांतील निवडक सरपंचांना हा सन्मान मिळाला असून वाशीम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान सुनीता मिटकरी यांना मिळाला आहे. त्यांनी या आमंत्रणाचा अभिमानाने स्वीकार करत गावाच्या नागरिकांचे अभिनंदन केले आणि भविष्यात ग्रामविकासासाठी अधिक प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासन दिले.
सुनीता मिटकरी गेल्या दहा वर्षांपासून सरपंच पदावर कार्यरत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ढोरखेडा गावात अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले गेले आहेत. गोदरी मुक्ती मोहीम, स्वच्छता अभियान, सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत सौर दिवे बसविणे, सिमेंट रस्त्यांची दुरुस्ती व बांधकाम, 24 तास पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण प्रकल्प, सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक पिठगिरणी, तंटामुक्ती, शाळा व अंगणवाडी सुधारणा, व्यायामशाळा उभारणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी यांसारख्या प्रकल्पांनी गावाचा चेहरा बदलला आहे.
महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी त्यांनी उमेद आणि महाराष्ट्र ग्रामीण जिवन्नोती अभियानांतर्गत विविध लघुउद्योग सुरू केले ज्यामुळे महिलांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आणि आर्थिक स्थितीत सुधारणा झाली. या कार्यामुळे ढोरखेडा गावाला अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. लाल किल्ल्यावरच्या आमंत्रणामुळे वाशीम जिल्ह्याच्या ग्रामविकासातील यशाची झलक देशभरात पोहोचली आहे आणि महिलांच्या नेतृत्वातून गावाचा विकास कसा होऊ शकतो याचा उत्कृष्ट आदर्श उभा राहिला आहे.