ऐरोली नाट्यगृह उभारणीला गती; कलाकारांसाठी आधुनिक सुविधा मिळणार

ऐरोली नाट्यगृह उभारणीला गती; कलाकारांसाठी आधुनिक सुविधा मिळणार
नवी मुंबईच्या ऐरोलीत सुरू असलेल्या नाट्यगृह प्रकल्पाला गती मिळाली असून, रंगकर्मींना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रभारी सुनील पगार यांनी पाहणी करत महत्त्वाच्या सुधारणा सुचविल्या.
सायली मेमाणे
नवी मुंबई ४ जुलै २०२५ : नवी मुंबईच्या ऐरोली परिसरात उभारल्या जाणाऱ्या नाट्यगृह प्रकल्पाला सध्या वेग मिळत असून, रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींसाठी हे एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रकल्प सध्या ४५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाला असून, उर्वरित कामातही वेगाने प्रगती केली जात आहे.
या नाट्यगृहाची नुकतीच भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ नवी मुंबईचे प्रभारी व अभिनेते सुनील रमेश पगार यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या सुधारणा सुचवत त्या नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या सूचनांमध्ये रंगमंचाचा आकार वाढवणे, स्वतंत्र चेंजिंग रूम, वाचन कट्टा, कलाकार कट्टा, आणि हायड्रोलिक ट्रॉलीची रचना यांसारख्या सुविधा समाविष्ट होत्या.
यासंदर्भातील निवेदन मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात सादर करण्यात आले होते. यावेळी डॉ. संजीव नाईक, अनंत सुतार, अक्षया चितळे यांची उपस्थिती होती. मंत्री नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले.
यानंतर नवी मुंबई महापालिकेचे अभियंते संजय पाटील, जितेंद्र नाईक, धनेश चव्हाण आणि संजय सिंग पाटील यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा नाट्यगृहाची पाहणी करण्यात आली. सुधारणा विनाअडथळा आणि विनातोडफोड कशा करता येतील यावर सकारात्मक चर्चा झाली.
सुनील पगार यांनी सांगितले की, “आपण मांडलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी सध्या उपलब्ध जागेतच शक्य आहे. आर्किटेक्चरसोबत लवकरच सविस्तर चर्चा करून पुढील पावले उचलली जातील.” या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील स्थानिक कलाकारांना आधुनिक व सुसज्ज नाट्यगृह मिळणार असून सांस्कृतिक चळवळीला नवा आयाम मिळणार आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter