पुण्यातील अल-कायदा संशयित जुबेर हंगरगेकरचा ‘ठाणे कनेक्शन’ उघड; एटीएसचा मोठा खुलासा

पुण्यातील अल-कायदा संशयित जुबेर हंगरगेकरचा ‘ठाणे कनेक्शन’ उघड; एटीएसचा मोठा खुलासा
अल-कायदाशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केलेल्या पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर जुबेर हंगरगेकरचा ठाणे-मुंब्रा कनेक्शन उघड झाला आहे. एटीएसने एका शिक्षकाची चौकशी केली असून, जुबेरच्या फोनमधून पाकिस्तानसह पाच परदेशी क्रमांक आढळले आहेत.
सायली मेमाणे
१२ नोव्हेंबर २०२५ : मुंबई – पुण्यात अटक करण्यात आलेल्या अल-कायदा संशयित सॉफ्टवेअर इंजिनिअर जुबेर हंगरगेकर प्रकरणात तपास अधिक गडद झाला आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) केलेल्या तपासात आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कनेक्शन उघड झाले आहे. हंगरगेकरने मुंब्रामध्ये एका शिक्षकाची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आली असून, एटीएसने या शिक्षकाची चौकशी केली आहे.
एटीएसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही भेट मुंब्र्यातील शिक्षकाच्या घरी झाली होती. तपासादरम्यान एटीएस अधिकाऱ्यांनी त्या शिक्षकाची विचारपूस केली. तथापि, एटीएसने स्पष्ट केले आहे की, शिक्षकाचा या गुन्ह्याशी थेट संबंध नाही, तो फक्त माहिती देण्यासाठी चौकशीत सहकार्य करत आहे.
जुबेर हंगरगेकर कोण आहे?
३७ वर्षीय जुबेर हंगरगेकर हा व्यावसायिक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, त्याला २७ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटना अल-कायदा (Al-Qaeda) आणि अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) यांच्याशी संबंध असल्याचा गंभीर आरोप आहे. हंगरगेकरवर कट्टरपंथी विचार पसरवण्याचा (Radicalisation) आणि तरुणांना धार्मिक अतिरेकाकडे प्रवृत्त करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
तपासादरम्यान एटीएसला हंगरगेकरच्या घरातून आणि उपकरणांमधून काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याच्या संगणकात आणि मोबाईलमध्ये अनेक संशयास्पद आणि आक्षेपार्ह फाईल्स आढळल्या आहेत. त्या फाईल्समध्ये ‘AQIS’ संघटनेबद्दलची माहिती, तसेच अल-कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेन याने ईद-उल-फितरच्या निमित्ताने दिलेल्या भाषणाचा उर्दू अनुवाद आढळून आला.
एटीएसने कोर्टात सांगितले की, झडतीदरम्यान जुबेरकडून ‘Inspire’ नावाचं मासिक सापडलं, ज्यामध्ये AK-47 रायफल हाताळण्याचे प्रशिक्षण आणि घरच्या घरी स्फोटक (IED) तयार करण्याची प्रक्रिया दिली होती. हे मासिक दहशतवादी संघटनांमध्ये वापरले जाणारे प्रोपगंडा साहित्य असल्याचे एटीएसने नमूद केले.
परदेशी संपर्क उघड
तपासादरम्यान एटीएसला जुबेरचा जुना मोबाईल फोन मिळाला. त्या फोनमधील संपर्क यादी (Contact List) तपासल्यावर पाच परदेशी क्रमांक आढळले — त्यापैकी दोन सौदी अरेबियाचे, तर पाकिस्तान, कुवेत आणि ओमानचे प्रत्येकी एक क्रमांक होते. तथापि, या क्रमांकांवरून कॉल केल्याचे कोणतेही रेकॉर्ड आढळले नसल्याचे एटीएसने स्पष्ट केले.
एटीएसच्या तपासात हे देखील समोर आले की, जुबेर हंगरगेकर पुण्यातील कोंढवा परिसरात राहात होता आणि तिथे तो स्थानिक तरुणांमध्ये धार्मिक अतिरेकी विचार पसरवत होता. तो प्रक्षोभक धार्मिक मुद्द्यांवर चर्चा करत असे आणि अल-कायदाच्या विचारसरणीशी संबंधित संदेश शेअर करत असे, असा आरोप आहे.
मुंब्रा कनेक्शन आणि पुढील तपास
मुंब्र्यातील एका शिक्षकाची भेट हा तपासातील महत्त्वाचा धागा मानला जात आहे. त्या भेटीत नेमकं काय झालं, याचा शोध एटीएस घेत आहे. या चौकशीदरम्यान काही तांत्रिक पुरावे आणि संवादांच्या नोंदी मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं. एटीएसने सांगितलं की, “सध्या प्राथमिक चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता तपासात आहे.”
या प्रकरणामुळे पुणे आणि मुंबई पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणाही सावध झाल्या आहेत. सायबर आणि आर्थिक पुरावे तपासले जात असून, जुबेरच्या संपर्कातील इतर व्यक्तींची चौकशी सुरु आहे.
या घडामोडींमुळे पुन्हा एकदा देशातील सायबर कट्टरपंथ आणि ऑनलाईन दहशतवादी नेटवर्क या विषयावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एटीएसने नागरिकांना आवाहन केलं आहे की, समाजात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter