बोटावरील शाई पुसू नका, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो; राज्य निवडणूक आयुक्तांचा कडक इशारा

0
बोटावरील शाई पुसू नका, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो; राज्य निवडणूक आयुक्तांचा कडक इशारा

बोटावरील शाई पुसू नका, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो; राज्य निवडणूक आयुक्तांचा कडक इशारा

मतदानावेळी बोटावरील शाई पुसल्यास मतदारांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

पुणे १५ जानेवारी २०२६ : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान बोटावरील शाईच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटावर मार्कर पेनने शाई लावली जात असून ही शाई काही वेळात पुसली जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विरोधी पक्षांनी या प्रकारावर आक्षेप घेत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर स्पष्टीकरण दिले आणि मतदारांना स्पष्ट इशाराही दिला.

दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोग २०१० पासून मार्कर पेनद्वारे शाई लावण्याची पद्धत वापरत आहे. या प्रक्रियेत कोरस कंपनीचे अधिकृत मार्कर पेन वापरण्यात येतात. या शाईमध्ये भारत निवडणूक आयोग वापरत असलेल्या केमिकल्सप्रमाणेच सिल्व्हर नायट्रेटचा वापर केला जातो. फरक इतकाच आहे की, भारत निवडणूक आयोग शाई काडीने लावतो, तर राज्य निवडणूक आयोग मार्कर पेनचा वापर करतो.

वाघमारे यांनी स्पष्ट केले की, या शाईला पूर्णपणे ड्राय होण्यासाठी साधारण १० ते १२ सेकंद लागतात. या कालावधीत मतदार मतदान केंद्राच्या आतच असतो. शाई पूर्णपणे वाळल्यानंतर ती सहज निघत नाही. मात्र, काही मतदार शाई ड्राय होण्याआधीच पुसण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ती निघाल्यासारखी दिसते. हा प्रकार आयोगाच्या दृष्टीने चुकीचा असून त्याची जबाबदारी संबंधित मतदारावरच येते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंबाबत बोलताना वाघमारे म्हणाले की, काही व्हिडीओंमध्ये शाई काढण्यासाठी कोणती केमिकल्स वापरली गेली, याची माहिती नाही. जर कुणी जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ तयार करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल, तर अशा व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल. व्हिडीओ खरे असतील, तर त्यांची सखोल चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी मतदारांच्या जबाबदारीवर विशेष भर दिला. मतदान हा केवळ अधिकार नसून जबाबदारीही आहे. शाई ड्राय होईपर्यंत संयम बाळगणे आवश्यक आहे. त्याआधी शाई पुसल्यास ती मतदारांची चूक मानली जाईल आणि अशा प्रकरणात मतदारांविरोधातही गुन्हा दाखल होऊ शकतो, असा थेट इशारा त्यांनी दिला.

या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असले तरी निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर ठाम भूमिका घेतली आहे. कोणत्याही अफवा, चुकीची माहिती किंवा हेतुपुरस्सर व्हिडीओंमुळे लोकशाही प्रक्रियेला धक्का लागू नये, यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत आयोगाने दिले आहेत. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही संभ्रमाला बळी न पडता नियमांचे पालन करत शांतपणे मतदान करावे, असे आवाहनही आयोगाकडून करण्यात आले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed