मर्डरची सुपारी द्या, एक कोटीत सुपारी घेतो… एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

0
मर्डरची सुपारी द्या, एक कोटीत सुपारी घेतो

मर्डरची सुपारी द्या, एक कोटीत सुपारी घेतो

छत्रपती संभाजीनगरात एन्काऊंटर झालेल्या गुंड अमोल खोतकरचा “एक कोटीत मर्डरची सुपारी” देणारा व्हिडिओ व्हायरल; पोलिस तपासाला वेग.

सायली मेमाणे

२६ जून २०२५: छत्रपती संभाजीनगर शहरात नुकत्याच झालेल्या एन्काऊंटर प्रकरणानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड अमोल खोतकरचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात तो थेट “मर्डरची सुपारी एक कोटीत घेतो” असं म्हणताना दिसतो. बंदुकीची सर्विसिंग करत असतानाचा हा व्हिडिओ पाहणाऱ्यांचे अंगावर शहारे आणतो आहे.

अमोल खोतकर हा काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावर झालेल्या दरोड्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होता. या दरोड्यात सुमारे साडेपाच किलो सोने आणि ३२ किलो चांदी चोरीला गेली होती. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अनेक पथकांची नियुक्ती करत तपास सुरू केला होता. तपासादरम्यान अमोल खोतकर वाळूज येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सापळा रचत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकिरण कच्चे यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात केलं. चारचाकी वाहनातून आलेल्या अमोल खोतकरला थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता, त्याने थेट गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्याचवेळी खोतकरने रिवॉल्वर बाहेर काढून पोलिसांवर रोखली. स्वतःच्या संरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि यात त्याचा एन्काऊंटर झाला.

या घटनेनंतर अमोल खोतकरच्या गुन्हेगारी कारवायांचा पाढा समोर येऊ लागला. विविध गंभीर कलमांखाली त्याच्यावर आधीपासूनच अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्याचा एक जुना व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये तो बंदुकीच्या तीन तुकड्यांची सफाई करताना स्पष्टपणे सांगतो – “मर्डरची सुपारी असेल तर द्या, एक गोळी खोपडी खाली, एका गोळीची किंमत एक कोटी आहे, ग्यारंटेड सुपारी घेतो.”

या व्हिडीओमुळे पोलीस यंत्रणा हादरली असून गुन्हेगारी नेटवर्कमधील इतर संशयितांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, अमोल खोतकरच्या बहिणीला देखील पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडूनही पुढील चौकशी केली जात आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस विभागाकडून आता या गँगशी संबंधित इतर सदस्यांचा शोध घेण्यात येत आहे. अमोल खोतकरचा असा उघडपणे मर्डरची सुपारी स्वीकारण्याचा व्हिडीओ म्हणजे गुन्हेगारीचा भयावह चेहरा पुन्हा एकदा उघड करणारा पुरावा आहे. पोलिस सूत्रांच्या मते, हा व्हिडीओ गुन्हेगारी नेटवर्कच्या आंतरिक रचनेवर प्रकाश टाकणारा असून त्याचा तपास आता सायबर शाखेद्वारे करण्यात येत आहे.

या व्हायरल व्हिडीओमुळे केवळ पोलिस यंत्रणाच नाही तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. मोक्काच्या चौकटीत हा गुन्हा येऊ शकतो, असा संकेत पोलिस सूत्रांनी दिला असून तपास अधिक गतीने पुढे नेला जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed