महाराष्ट्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली; रायगडमध्ये हाय अलर्ट जारी
महाराष्ट्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली; रायगडमध्ये हाय अलर्ट जारी
रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी चिन्ह असलेली संशयास्पद बोट आढळली असून सुरक्षा यंत्रणांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नौदल, तटरक्षक दल, पोलीस व BDDS टीम घटनास्थळी.
सायली मेमाणे
रायगड ७ जुलै २०२५ : Raigad News: महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर एका संशयास्पद बोटीची उपस्थिती आढळून आल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. ही बोट परदेशी असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यावर काही विशिष्ट देशाचे चिन्ह असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बोट समुद्रात भरकटून रायगड किनाऱ्यावर आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. या बोटीच्या उपस्थितीची माहिती मिळताच रायगड पोलीस, बॉम्ब शोध व निकामी पथक (BDDS), झपाट्याने कृती करणारी टीम (QRT), नौदल आणि तटरक्षक दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले.
रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल आणि अन्य वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, जोरदार पावसामुळे आणि समुद्रात वादळी वाऱ्यामुळे बोटीपर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण झाला आहे. पोलीस अधीक्षकांनी स्वतः बार्जच्या साहाय्याने बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र हवामानामुळे त्यांना माघारी परतावं लागलं.
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करत समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांमध्ये खबरदारी घेण्यात येत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा प्रकार गतवर्षी पुण्यातील हरिहरेश्वरजवळ आढळलेल्या ‘बोट बँक’च्या घटनेशी साधर्म्य दर्शवत असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू असून केंद्रीय गुप्तचर यंत्रणादेखील सतर्क झाल्या आहेत.