माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकाची मनमानी? रात्री सेवा नाकारल्याने पालकांची तक्रार

0
माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकाची मनमानी? रात्री सेवा नाकारल्याने पालकांची तक्रार

माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकाची मनमानी? रात्री सेवा नाकारल्याने पालकांची तक्रार

माथेरानमध्ये रात्री दहा वाजता तरुणीला ई-रिक्षा सेवा नाकारल्याचा आरोप; चालकाच्या उद्धट वर्तनाची तक्रार, परिवहन विभागाच्या कारवाईकडे लक्ष.

पुणे ११ ऑगस्ट २०२६ : माथेरानमध्ये पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या ई-रिक्षा सेवेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरात ई-रिक्षांची संख्या कमी असल्याची चर्चा सुरू असतानाच एका तरुणीला रात्रीच्या वेळी ई-रिक्षा सेवा नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत संबंधित तरुणीच्या पालकांनी लेखी निवेदन देऊन तक्रार केली आहे. त्यामुळे माथेरानमधील ई-रिक्षा सेवेचे नियमन, चालकांचे वर्तन आणि रात्रीच्या सेवेसंदर्भातील नियम याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माथेरान शहरातील एका तरुणीला रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास प्रवासासाठी ई-रिक्षाची आवश्यकता होती. मात्र, संबंधित ई-रिक्षाचालकाने सेवा देण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सेवा का दिली जात नाही, याबाबत विचारणा केली असता चालकाकडून उद्धटपणे उत्तरे देण्यात आल्याचे पालकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित चालकाच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती शिवसेना पक्षाच्या महिला संपर्कप्रमुखांना मिळाल्यानंतर त्यांनीही संबंधित चालकाच्या वर्तनाबाबत तक्रार करण्याची भाषा केली. मात्र, त्यानंतरही चालकाच्या वर्तनात कोणताही बदल झाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ई-रिक्षा चालकांच्या मनमानीवर रिक्षा संघटना नियंत्रण ठेवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माथेरान हे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने येथे पर्यावरणपूरक ई-रिक्षा सेवा महत्त्वाची ठरते. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या वाहतुकीसाठी या सेवेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, सेवा उपलब्धतेबाबत तक्रारी येत असतील तर त्याची गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विशेषतः स्थानिक नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, माथेरानमध्ये ई-रिक्षा रात्रीच्या वेळेत नेमक्या कोणत्या नियमांनुसार सुरू ठेवल्या जातात, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ई-रिक्षांच्या वेळा, मार्ग, भाडे आणि सेवा देण्याच्या नियमांचे पालन केले जाते की नाही, याची तपासणी संबंधित विभागाने करावी, अशी मागणी होत आहे. पर्यटकांकडून निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारीही असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाडे आकारणीबाबतही प्रशासनाने स्पष्टता आणण्याची गरज आहे.

या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन रिक्षा संघटना संबंधित चालकावर कारवाई करणार का, तसेच विभागीय परिवहन अधिकारी ई-रिक्षा सेवेच्या नियमांची तपासणी करून दोषींवर कारवाई करणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. माथेरानमध्ये स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना नियमबद्ध, सुरक्षित आणि पारदर्शक ई-रिक्षा सेवा मिळावी, यासाठी प्रशासनाने तक्रारींची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करणे अपेक्षित आहे. या घटनेमुळे माथेरानमधील ई-रिक्षा सेवेच्या व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *