मुंबई पोलिस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळीपूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था

मुंबई पोलिस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळीपूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था
गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळीपूर्वी मुंबई पोलिसांची व्यापक तयारी. गर्दी नियंत्रण, सीसीटीव्ही, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
सायली मेमाणे
पुणे ११ ऑगस्ट २०२५ : मुंबईत स्वातंत्र्यदिन, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी यांसारख्या प्रमुख सणांचा हंगाम सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्याची तयारी केली आहे. पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्सवादरम्यान पोलिसांची उपस्थिती स्पष्ट दिसून यावी, नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद द्यावा आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक ठिकाणी, महत्त्वाच्या इमारतींमध्ये आणि गर्दीच्या भागांत पोलिस बंदोबस्त वाढवला जाईल. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तचर यंत्रणा अधिक सक्रिय राहणार आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या १० दिवसीय गणेशोत्सवासाठी विशेष सुरक्षा उपाययोजना आखण्यात आल्या असून, प्रत्येक गणेश मंडळासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची नियुक्ती बंधनकारक करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देत विसर्जन मिरवणुकीसाठी निश्चित मार्ग ठरवले जाणार आहेत.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सणांचा आनंद सुरक्षित वातावरणात घ्यावा आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीची तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी. पोलिसांचा उद्देश उत्सव काळात सुव्यवस्था राखून नागरिकांना सुरक्षित आणि आनंददायी अनुभव देणे हा आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter