शरद पवार, पार्थ पवार यांच्यात काय चर्चा झाली? रोहित पवारांचा मोठा खुलासा; म्हणाले ‘आमच्यात भावनिक संवाद झाला’
शरद पवार, पार्थ पवार यांच्यात काय चर्चा झाली? रोहित पवारांचा मोठा खुलासा; म्हणाले ‘आमच्यात भावनिक संवाद झाला’
शरद पवार, पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यातील चर्चेवर रोहित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येत असल्याचे संकेत त्यांनी दिले.
पुणे ०७ जानेवारी २०२६ : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे मतदान सुरू असतानाच पवार कुटुंबाशी संबंधित घडामोडींनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर संपूर्ण राज्यासह पवार कुटुंबावर शोककळा पसरली होती. या दु:खद घटनेनंतर पवार कुटुंबातील सदस्य एकत्र येताना दिसले. मात्र, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कुटुंबातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले. अशा पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी केलेले वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
पिंपळी गावात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या स्वप्नांविषयी भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दादांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवडून यावेत, ही अजित पवार यांची तीव्र इच्छा होती. दुर्दैवाने ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे स्वप्न मतदार आणि कार्यकर्ते नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांची कायम इच्छा होती की पवार कुटुंब एकत्र राहावे. त्या दृष्टीने दादांकडून सातत्याने प्रयत्न होत होते. सुप्रिया सुळे, शरद पवार आणि कुटुंबातील इतर सदस्यही हा समन्वय राखण्याचा प्रयत्न करत होते. कोणाच्याही खास पुढाकाराविना कुटुंब पुन्हा एकत्र येत असल्याचे चित्र सध्या दिसत असून, हीच बाब अजित पवार यांचे स्वप्न होते, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शरद पवार, पार्थ पवार आणि रोहित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओबाबत विचारले असता रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, त्यांच्यात राजकीय नव्हे तर भावनिक चर्चा झाली. काही वैयक्तिक आणि कौटुंबिक बाबींवर संवाद झाला असून, येत्या काळात काही गोष्टी कशा पद्धतीने पुढे न्यायच्या यावर विचार झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, त्यांच्यात त्यांना अजित पवार यांचेच प्रतिबिंब दिसते. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील जबाबदाऱ्या आणि नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला असून, राष्ट्रीय अध्यक्षपदाची रिक्त जागा सुनेत्रा पवार यांनाच मिळावी, अशी कुठेतरी भावना असल्याचे त्यांनी सूचक शब्दांत सांगितले. मात्र, यावर अंतिम निर्णय पक्षपातळीवर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत पवार कुटुंबातील एकत्र येण्याचे संकेत महत्त्वाचे मानले जात आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीची भर कशी भरली जाईल आणि पवार कुटुंबाची पुढील राजकीय दिशा काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे पवार कुटुंबातील भावनिक एकजूट आणि भविष्यातील राजकीय हालचालींवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information