सांगलीत 108 रुग्णवाहिकांची अवस्था दयनीय; प्राथमिक उपचार सुविधांचा बोजवारा

0
सांगलीत 108 रुग्णवाहिकांची अवस्था दयनीय; प्राथमिक उपचार सुविधांचा बोजवारा

सांगलीत 108 रुग्णवाहिकांची अवस्था दयनीय; प्राथमिक उपचार सुविधांचा बोजवारा

सांगली जिल्ह्यातील 108 अत्यावश्यक रुग्णवाहिका सेवांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. रुग्णवाहिकांमध्ये प्राथमिक उपचार सुविधा नसल्याने रुग्णांची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

सायली मेमाणे

पुणे १८ ऑक्टोबर २०२५ : सांगली : जिल्ह्यातील 108 अत्यावश्यक रुग्णवाहिकांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय बनत चालली आहे. रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या सेवांचा दर्जा सध्या इतका खालावला आहे की, रुग्णवाहिकांमध्ये प्राथमिक उपचारांच्या सुविधाही उपलब्ध नाहीत. परिणामी, अनेकदा रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागतो.

कुपवाड शहरातील बामणोली परिसरात घडलेल्या एका घटनेनंतर या सेवांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. येथील एका रुग्णाला 108 रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, फर्स्ट-एड किट आणि वैद्यकीय उपकरणांचा अभाव असल्याने रुग्णाची प्रकृती मार्गातच अधिक गंभीर झाली, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्य विभागावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “108 सेवा नावालाच आपत्कालीन आहे. वाहनांचे तांत्रिक बिघाड, अपुरी देखभाल, तुटपुंज्या सुविधा आणि अपुरे प्रशिक्षित कर्मचारी यामुळे रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे निष्प्रभ झाली आहे.”

सांगली जिल्ह्यात एकूण 38 रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे सांगितले जाते, मात्र त्यापैकी अनेक वाहनं कालबाह्य झाली असून, तांत्रिक बिघाडांमुळे वेळेवर सेवा देणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी रुग्णवाहिका इंधनाच्या अभावामुळे अडवून ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 108 रुग्णवाहिका सेवांचे टेंडर खासगी संस्थांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे देखभाल आणि उपकरणांची जबाबदारी संबंधित संस्थांवर आहे. मात्र, प्रत्यक्षात या वाहनांची नियमित तपासणी होत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनीच केला आहे.

आरोग्य कार्यकर्त्यांच्या मते, रुग्णवाहिकांमध्ये असणाऱ्या जीवनरक्षक यंत्रणांची नियमित चाचणी आणि तपासणी केली गेली पाहिजे. “जर हे उपकरणे वेळेवर कार्यरत नसतील, तर ही सेवा रुग्णांसाठी जीवघेणी ठरू शकते,” असे एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, या प्रकरणानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तातडीने चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. दोषी ठरलेल्या कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सांगलीसारख्या जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका ही आपत्कालीन आरोग्य सेवेची कणा मानली जाते. मात्र, अशा गंभीर त्रुटीमुळे रुग्णांच्या जीवावर बेतणाऱ्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या सेवांची देखभाल, उपकरणांची उपलब्धता आणि प्रशिक्षित कर्मचारी नेमणे ही सरकारची तातडीची गरज बनली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed