पुण्यातील बलात्कार प्रकरणात आरोपीला 10 वर्षांची शिक्षा; पीडितेच्या धाडसामुळे नराधम जेरबंद

पुण्यातील बलात्कार प्रकरणात आरोपीला 10 वर्षांची शिक्षा; पीडितेच्या धाडसामुळे नराधम जेरबंद
पुण्यात 2020 मध्ये महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्या ट्रक चालकाला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. डीएनए अहवाल आणि पीडितेच्या साक्षीच्या आधारे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
पुणे ११ जून २०२६ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात 2020 मध्ये घडलेल्या एका गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी ट्रक चालकाला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पीडित महिलेच्या ठाम साक्षी, डीएनए अहवाल आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला.
करमवीर गुलाबराव जेसवार (वय 34, रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 4 ऑगस्ट 2020 रोजी दुपारच्या सुमारास गहुंजे ते साईनगर मार्गावरील मामुर्डी परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. घटनेनंतर पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार, पीडित महिला घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. घटनेच्या दिवशी काम आटोपून ती घरी परतत असताना मुसळधार पाऊस सुरू होता. तिच्याकडे असलेल्या छत्रीची मागणी आरोपीने केली. मात्र महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवत तिला गवताळ भागात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिच्यावर मारहाण केली आणि तिचे कपडे फाडल्याचे तपासात समोर आले. काही काळ आरोपीच्या तावडीत अडकल्यानंतर तिने धैर्य दाखवत स्वतःची सुटका करून घेतली आणि मदतीसाठी मुख्य रस्त्याकडे धाव घेतली. तिची अवस्था पाहून काही नागरिकांनी आणि रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी तिला मदत केली. त्यानंतर ती घरी पोहोचली आणि कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगून पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, फाटलेले कपडे, डीएनए नमुने आणि वैद्यकीय तपासणी अहवाल गोळा केले. या सर्व पुराव्यांनी पीडितेच्या जबाबाला दुजोरा दिला. तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर कारागृहात ओळख परेड घेण्यात आली होती. त्यावेळी तसेच न्यायालयात साक्ष देताना पीडितेने आरोपीची स्पष्ट ओळख पटवली.
खटल्यादरम्यान बचाव पक्षाने आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आणि संबंध परस्पर संमतीने झाल्याचा दावा केला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. पीडितेची साक्ष विश्वासार्ह असल्याचे नमूद करत न्यायालयाने उपलब्ध वैज्ञानिक आणि वैद्यकीय पुराव्यांचा आधार घेत आरोपीला दोषी ठरवले.
निकाल देताना न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील पीडितेची साक्ष ही जखमी साक्षीदाराच्या साक्षीइतकीच महत्त्वाची असते आणि कोणतीही सामान्य महिला विनाकारण अशा प्रकारचा गंभीर आरोप करण्याचे धाडस करणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणातील दंडाची रक्कम आरोपीकडून वसूल करून ती पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या निकालामुळे लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वैज्ञानिक पुरावे, पीडितेची साक्ष आणि प्रभावी तपास यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShar