डोंबिवलीत ‘फोडाफोडी’चे राजकारण ? भाजप विरुद्ध शिंदेसेना

0
डोंबिवलीत 'फोडाफोडी'चे राजकारण ? भाजप विरुद्ध शिंदेसेना

डोंबिवलीत 'फोडाफोडी'चे राजकारण ? भाजप विरुद्ध शिंदेसेना

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील कथित मतभेद आता थेट संघर्षाच्या पातळीवर पोहोचले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांनंतर, डोंबिवलीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर ‘प्रलोभन देऊन पक्ष फोडण्याचा’ गंभीर आरोप केला आहे.
पैशांचे प्रलोभन आणि पक्ष फोडण्याचे आरोप
शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधला. चव्हाण हे कल्याण-डोंबिवलीतील इतर पक्षांच्या आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना महामंडळ, निवडणुकीचा खर्च आणि विशेष पॅकेजचे प्रलोभन दाखवत असल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला. “हे आरोप केवळ डोंबिवलीतच नव्हे, तर मालवणमध्येही झाले आहेत,” असे ते म्हणाले.
‘कोणत्या बेसवर प्रदेशाध्यक्ष?’
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “इतक्या मोठ्या पदावर असून, चार वेळा आमदार, एकदा मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष झालेले असतानाही चव्हाण यांना स्वतःचे शहर, गड आणि मतदारसंघ बांधता आला नाही. पक्षाने त्यांना कोणत्या बेसवर प्रदेशाध्यक्ष केले आहे?” असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
तसेच, “शिवसेनेचे शंभर कार्यकर्ते फोडले असले तरी, त्यातून हजार कार्यकर्ते पुन्हा उभे करण्याची ताकद शिवसेनेत आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या युतीचा इतिहास चव्हाण यांनी लक्षात ठेवावा,” अशा शब्दांत शिंदे गटाने भाजप नेत्याला इशारा दिला.
शिंदे गटाला धक्का, भाजपमध्ये प्रवेशसोहळा
दरम्यान, या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच, डोंबिवलीतील मनसेच्या कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
केडीएमसी भाजप निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि दीपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशानंतर लगेचच शिंदे गटाने भाजप प्रदेशाध्यक्षांवर पत्रकार परिषद घेऊन निशाणा साधल्याने, महायुतीमध्ये डोंबिवली-कल्याण पट्ट्यात अंतर्गत धुसफूस वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed