युनिट 4 ची दमदार कामगिरी वाकडेवाडी रॉयल एनफिल्ड शोरूम मध्ये दरोडा टाकणारा चोरटा युनिट 4 कडून जेरबंद
पुण्यात रॉयल एनफिल्ड शोरूममध्ये जबरी चोरी; युनिट 4 कडून आरोपी अटक
पुण्यात वाकडेवाडी येथील रॉयल एनफिल्ड शोरूममध्ये वॉचमनला चाकूचा धाक दाखवत ₹7.11 लाखांची रोकड लुटणारा कर्मचारी प्रतिक सावंत याला युनिट 4 ने जेरबंद केले.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे २७ ऑगस्ट २०२५ : पुणे : चाकूचा धाक दाखवत वाकडेवाडी येथील रॉयल एनफिल्ड (बुलेट) मोटारसायकल शोरूममधून तब्बल ₹7 लाख 11 हजार रुपये लुटणाऱ्या आरोपीस युनिट 4 गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या आठ दिवसांत जेरबंद केले.
दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे साडे-दोनच्या सुमारास वाकडेवाडी, शिवाजीनगर येथील ब्रम्हा मोटर्सच्या शोरूममध्ये चोरीची ही घटना घडली होती. शोरूमच्या वॉचमनच्या गळ्यावर चाकू ठेवून जीव मारण्याची धमकी देत काउंटर ड्रॉवरमधील ₹7.11 लाखांची रोकड आरोपीने लंपास केली होती. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
गोपनीय बातमीदारांच्या माहितीनुसार, हा गुन्हा शोरूममधीलच कर्मचारी प्रतिक भारत सावंत (वय 23, रा. महर्षीनगर, गुलटेकडी, पुणे) याने केल्याचे उघडकीस आले. प्रतिक शोरूममध्ये स्टोअर कीपर म्हणून कार्यरत होता. त्याला शोरूममध्ये ठेवलेल्या रोकडीची माहिती होती. यानंतर युनिट 4 च्या पथकाने महर्षीनगर परिसरात सापळा रचून त्याला अटक केली.
तपासादरम्यान प्रतिकने कबुली दिली की, त्याने वॉचमनला चाकूचा धाक दाखवून रोकड चोरली आणि त्यानंतर पळून गेला.
आरोपीकडून काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर (MH-12-FV-0686) दुचाकी (₹50,000 किमतीची) जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास खडकी पोलीस ठाणे करत आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-2) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत युनिट-4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहायक पोलीस फौजदार हरीश मोरे, हवालदार अमजद शेख, तुषार खराडे, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, जहांगीर पठाण यांचा विशेष सहभाग होता.