पुण्यात हायप्रोफाईल सोसायटीत मुलांना सराईत गुन्हेगाराची अमानवी मारहाण; राजकीय कनेक्शन उघड

पुण्यातील हायप्रोफाईल लोढा सोसायटीत क्लब हाऊस मध्ये अल्पवयीन मुलांना सराईत गुन्हेगाराकडून मारहाण
पुण्यातील लोढा सोसायटीतील क्लब हाऊसमध्ये सराईत गुन्हेगार किशोर भेगडे याने अल्पवयीन मुलांना मारहाण केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल; गुन्हा दाखल, राजकीय संबंधांमुळे खळबळ.
सायली मेमाणे
पुणे 30 जुलै २०२५ : पुणे – पिंपरी चिंचवड परिसरातील गहूंजे येथील हायप्रोफाईल ‘लोढा’ सोसायटीतील क्लब हाऊस परिसरात अल्पवयीन मुलांना एका सराईत गुन्हेगाराकडून जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किशोर भेगडे नावाचा आरोपी, जो मावळ मतदारसंघातील राजकीय नेते बापू भेगडे यांचा पुतण्या आहे, त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून त्याचा रेकॉर्ड पाहता संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्लब हाऊसमध्ये किशोर भेगडेचा मुलगा आणि इतर मुले खेळत असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला. हा वाद समजताच किशोर भेगडे संतप्त झाला आणि थेट क्लब हाऊसमध्ये धाव घेतली. त्याने एका १५ वर्षीय मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात किशोर भेगडे एका मुलाच्या पोटात जोरदार लाथ मारताना स्पष्ट दिसत आहे.
मुलाच्या नातेवाईकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून किशोर भेगडेवर “जीवघेणा हल्ला” आणि “अल्पवयीन मुलांवर अत्याचार” यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेचा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी किशोर भेगडेच्या राजकीय पार्श्वभूमीचा उल्लेख करत पोलिसांवर दडपशाही टाकण्याचा आरोप केला आहे. काही नागरिकांनी या प्रकरणाची सीसीटीव्ही फूटेज व पोलिस तपासाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हायप्रोफाईल सोसायटीतही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सोसायटी प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी, अन्यथा अशा घटना पुन्हा घडू शकतात.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter