सप्टेंबर 2025 बँक हॉलिडेज: 30 दिवसांत तब्बल 15 दिवस बँका बंद, वाचा संपूर्ण यादी

सप्टेंबर 2025 बँक हॉलिडेज: 30 दिवसांत तब्बल 15 दिवस बँका बंद, वाचा संपूर्ण यादी
सप्टेंबर 2025 मध्ये एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्यांसोबतच करमा पूजा, ओणम, ईद-ए-मिलाद आणि नवरात्र यांसारख्या सणांचा समावेश आहे. संपूर्ण लिस्ट पाहा.
सायली मेमाणे
पुणे ३० ऑगस्ट २०२५ : सप्टेंबर 2025 महिन्यात बँकांना मोठ्या प्रमाणावर सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, या महिन्यात बँका तब्बल 15 दिवस बंद राहतील. यामध्ये रविवारी, दुसरा आणि चौथा शनिवार यांसारख्या साप्ताहिक सुट्ट्या तसेच विविध प्रादेशिक आणि धार्मिक सणांचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या शाखेत जाण्यापूर्वी या यादीची नक्कीच दखल घ्यावी.
ऑगस्ट महिना संपताच सर्वसामान्य नागरिकांना नव्या महिन्यात बँका कधी बंद राहतील, कोणत्या दिवशी सुट्टी आहे याची उत्सुकता असते. सप्टेंबर महिन्यात करमा पूजा, ओणम, ईद-ए-मिलाद आणि नवरात्रासारखे सण आल्यामुळे बँका देशभरातील अनेक राज्यांमध्ये बंद राहतील. त्यामुळे 30 दिवसांच्या या महिन्यात तब्बल अर्धा महिना म्हणजेच 15 दिवस सुट्ट्या असणार आहेत.
नियमाप्रमाणे बँका प्रत्येक रविवारी आणि महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद राहतात. त्यामुळे सप्टेंबर 7, 14, 21 आणि 28 हे चार रविवार सुट्टीचे असतील. त्याचप्रमाणे सप्टेंबर 13 आणि सप्टेंबर 27 हे अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवार असल्यामुळे त्या दिवशीही बँका बंद राहतील. याशिवाय आरबीआयच्या सुट्टी कॅलेंडरनुसार देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिक सणांनिमित्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
झारखंडमध्ये 3 सप्टेंबर रोजी करमा पूजेनिमित्त बँका बंद राहतील. 4 सप्टेंबर रोजी केरळमध्ये पहिला ओणम साजरा होणार असल्यामुळे तिथल्या बँका बंद असतील. 5 सप्टेंबर रोजी देशातील गुजरात, मिझोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, मणिपूर, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली, केरळ, झारखंड आणि तेलंगणा अशा अनेक राज्यांमध्ये ईद-ए-मिलाद/मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने सुट्टी असणार आहे. 6 सप्टेंबर रोजी सिक्कीम व छत्तीसगडमध्ये इंद्रजत्रा आणि ईद-ए-मिलादसाठी बँका बंद राहतील. 12 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतरचा शुक्रवार सुट्टी म्हणून जाहीर केला गेला आहे.
यानंतर 22 सप्टेंबर रोजी राजस्थानमध्ये नवरात्र स्थापना, तर 23 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये महाराजा हरी सिंह यांच्या जयंतीनिमित्त बँका बंद राहतील. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवरात्र आणि दुर्गा पूजेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर सुट्ट्या असतील. 29 सप्टेंबर रोजी त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये महा सप्तमीच्या निमित्ताने सुट्टी असेल. तर 30 सप्टेंबर रोजी त्रिपुरा, ओडिशा, आसाम, मणिपूर, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये महाअष्टमी/दुर्गा अष्टमी निमित्त बँका बंद राहतील.
या सर्व सुट्ट्यांमध्ये बँकांच्या शाखांमधील प्रत्यक्ष व्यवहार बंद राहतील. म्हणजेच पैसे जमा करणे, काढणे, धनादेश वठवणे, कर्ज अर्ज स्वीकारणे यांसारख्या सेवांचा लाभ घेता येणार नाही. मात्र नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय, एटीएमसारख्या डिजिटल सेवा २४ तास सुरू राहतील. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना कोणताही अडथळा येणार नाही. परंतु शाखेत जाऊन काम करणाऱ्यांनी सुट्टीचे वेळापत्रक पाहूनच नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा फुकाची फेरी होण्याची शक्यता आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter