पुण्यातील रक्तरंजित गुन्ह्यांना ‘एमपी कनेक्शन’; उमर्टी गावावर पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
पुण्यातील रक्तरंजित गुन्ह्यांना ‘एमपी कनेक्शन’; उमर्टी गावावर पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
पुणे आणि मध्यप्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईत उमर्टी गावातील ५० भट्टया उद्ध्वस्त, शेकडो शस्त्रास्त्रे जप्त. शरद मोहोळ, वनराज आंदेकरसारख्या प्रकरणांमध्ये याच गावातील शस्त्रांचा वापर. तीन राज्यांत गुन्हेगारीला पुरवठा.
सायली मेमाणे
पुणे २४ नोव्हेंबर २०२५ : पुण्यातील रक्तरंजित गुन्हेगारीचा मागोवा घेताना पोलिसांनी मोठी साखळी उघडकीस आणली आहे. पुणे शहरातील गेल्या काही वर्षांतील खून, हल्ले, सुपारी किलिंग आणि गँगवारमध्ये वापरली गेलेली गावठी शस्त्रे मध्यप्रदेशातील बदवानी जिल्ह्यातील उमर्टी या दुर्गम गावात तयार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांसह संयुक्तपणे कारवाई करत इतिहासातील सर्वात मोठे ऑपरेशन राबवले. २२ नोव्हेंबर २०२५ च्या पहाटे सुरू झालेल्या या धडाकेबाज मोहिमेत ५० हून अधिक अवैध शस्त्रनिर्मिती कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले, तर शेकडो बंदूकांसह दारूगोळा जप्त करण्यात आला.
या ऑपरेशनमध्ये पुणे पोलिस दलातील जवळपास १५० पोलिस अधिकारी आणि जवान सहभागी होते. डीसीपी सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उमर्टी गावात कोबिंग ऑपरेशन राबवले. छापेमारीदरम्यान ४७ जणांना ताब्यात घेण्यात आले, त्यापैकी १० जणांना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण गावात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती केंद्रांचा नायनाट करताना पोलिसांना मोठ्या प्रमाणात गावठी पिस्तुले, रायफल्स, बनावट ब्रँडचे शस्त्रांचे साहित्य आणि तयार भट्ट्या आढळल्या.
उमर्टी गावातील ही शस्त्रनिर्मिती साखळी महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड आणि अन्य राज्यांमध्ये सक्रिय पसरलेली होती. प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे की, या गावातून गेल्या काही वर्षांत ७०० ते ८०० शस्त्रांची तस्करी महाराष्ट्रात करण्यात आली. पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड शरद मोहोळ, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणांसह अनेक सुपारी किलिंगमध्ये याच गावात तयार झालेल्या गावठी पिस्तुलांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
“ही फक्त सुरुवात आहे. या शस्त्रपुरवठा साखळीतील सर्वांना आरोपी करण्यात येईल. शस्त्र कोणाकडे गेले, कोणाकडून मागवले गेले आणि कोण वापरत होते याची पूर्ण साखळी आम्ही उकलणार आहोत,” असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. या कारवाईनंतर पोलिसांकडे काही महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले आहेत. पुण्यातील गँगवारमध्ये वाढती शस्त्रवापराची मालिका थांबवण्यासाठी ही कारवाई निर्णायक मानली जात आहे.
मध्यप्रदेशातील उमर्टी गाव हा प्रत्यक्षात वनक्षेत्रातील दूरस्थ भाग आहे. दशकभरापासून येथे अवैध शस्त्रनिर्मिती चालत होती. गावातील काही कुटुंबे पिढ्यान्पिढ्या ‘मेक-इन-उमरटी’ प्रकारची शस्त्रे बनवत होती. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कारागिरांची कौशल्यपूर्ण निर्मिती आणि लपवाछपवी करण्यासाठीचा भौगोलिक फायदा यामुळे हे रॅकेट वर्षानुवर्षे सुरु राहिले.
पुण्यातील रक्तरंजित गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांच्या स्त्रोतावर मोठा वार करत या कारवाईने गुन्हेगारीचे जाळे कमकुवत केले आहे. मोहोळ, आंदेकरसारख्या गँगशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी ही बाहेरची साखळी शोधून काढली. अनेक प्रकरणांमध्ये एकाच प्रकारची शस्त्रे आढळल्याने तपास अधिक खोलात गेला आणि अखेर ही मोठी पुरवठा साखळी उघड झाली.
या कारवाईनंतर गुन्हेगारी जगताला मोठा धक्का बसला असून आगामी काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या अटकसत्रांची शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन राज्यांमध्ये पसरलेल्या या पुरवठा नेटवर्कचा उद्देश संपवण्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. पुण्यातील गँगवार आणि शस्त्राधारित गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी ही कारवाई एक महत्वपूर्ण टप्पा ठरली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information