• Thu. Jul 24th, 2025

NewsDotz

मराठी

Rain Alert : उत्तराखंडपासून गंगेच्या मैदानी प्रदेशापर्यंत पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, महापूर भूस्खलनाचा धोका वाढला

Jun 30, 2025
उत्तराखंडपासून गंगेच्या मैदानी प्रदेशापर्यंत पावसाचा कहरउत्तराखंडपासून गंगेच्या मैदानी प्रदेशापर्यंत पावसाचा कहर

Rain Alert : देशभरात मान्सूनने तडाखा दिला असून उत्तर भारतात पूर, ढगफुटी व भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे; हवामान खात्याचा रेड अलर्ट.

सायली मेमाणे

पुणे 30 जून २०२५ : देशभरात दक्षिण-पश्चिम मान्सूनने अपेक्षेपेक्षा नऊ दिवस आधीच जोरदार हजेरी लावली असून, भारतीय हवामान विभागाने संपूर्ण देशात मान्सून सक्रीय झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही बातमी जरी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असली, तरी उत्तर भारतातील डोंगराळ व मैदानी भागांमध्ये प्रचंड हाहाकार माजवणारी ठरली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि ओडिशामध्ये पावसाच्या तडाख्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून पूरस्थिती, ढगफुटी आणि भूस्खलनाचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे.

हिमाचल प्रदेशात मान्सूनची सुरुवातच संकटांनी ग्रस्त झाली आहे. सोलन जिल्ह्यात शिमला-कालका रेल्वेमार्गावर दरड व झाडांच्या कोसळण्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे, तर मंडी जिल्ह्यात ब्यास नदी धोक्याच्या पातळीवर असून लारजी आणि पंडोह धरणांमधून हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कांगडा, शिमला, सोलन आणि मंडीसह १० जिल्ह्यांमध्ये फ्लॅश फ्लडचा इशारा देण्यात आला असून अनेक राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत. आतापर्यंत ३० पेक्षा अधिक नागरिकांचे मृत्यू या हवामान आपत्तीमध्ये झाले आहेत.

मनाली परिसरात दोन वर्षांपूर्वी आलेल्या प्रलयंकारी पुराच्या आठवणी अजूनही ताज्या असतानाच, पुन्हा ब्यास नदी मार्ग बदलत असल्याने भीतीचे वातावरण आहे. नदीकाठच्या घरांना आणि दुकानांना प्रचंड नुकसान झाले आहे. झारखंडमधील रजरप्पा सिद्धपीठाजवळील भैरवी नदीने रौद्ररूप धारण करून एका तरुणाचा जीव घेतला, तर जमशेदपूरमध्ये अनेक भाग जलमय झाले आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गंगानदीचा पाण्याचा स्तर वेगाने वाढत असून नदीने धोकादायक पातळी गाठली आहे. राजस्थानच्या पाली आणि ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यांमध्येही पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

बिहारमधील पटना सहित दहा जिल्ह्यांमध्ये IMD ने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा अधिक तीव्र असून चारधाम यात्रा पुढील २४ तासांसाठी स्थगित करण्यात आली आहे. श्रीनगर, रुद्रप्रयाग, बडकोट आणि विकासनगर येथे यात्रेकरूंना थांबवण्यात आले आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील बडकोटजवळ सिलाई बेंड येथे झालेल्या ढगफुटीमुळे भूस्खलन होऊन दोन मजुरांचे मृतदेह सापडले असून सात जण अद्याप बेपत्ता आहेत. यमुना व गंगा राजमार्गांवरील वाहतूक ठप्प असून उत्तराखंडमधील नऊ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशाच्या उत्तर भागात मान्सूनच्या सुरुवातीसह निसर्गाचा रौद्र अवतार पाहायला मिळत असून, डोंगराळ भागांत ढगफुटी, भूस्खलन आणि मैदानांत पूर, जलभराव यामुळे लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून सतत सतर्कतेच्या सूचना दिल्या जात असल्या, तरी हवामान खात्याने पुढील २४ तास उत्तर भारतासाठी अत्यंत धोकादायक असल्याचा इशारा दिला आहे. शाळा बंद, रेल्वे रद्द, महामार्ग बंद अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसाठी हे खडतर दिवस ठरत आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि नद्या-नाल्यांच्या जवळ जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune