Yugendra Pawar Engagement : राष्ट्रवादी नेते शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांचा तनिष्का प्रभूसोबत साखरपुडा; सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केला खास क्षण.
सायली मेमाणे
पुणे 30 जून २०२५ : पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघड्यांचे सूर घुमत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांचा साखरपुडा तनिष्का प्रभू हिच्यासोबत पार पडला आहे. हा खासगी समारंभ २८ जून रोजी पार पडला असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी या आनंदाच्या प्रसंगी युगेंद्र व तनिष्कासोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला असून पवार कुटुंबातील या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात आणि समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंबात अवघ्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा विवाहसोहळ्याची गडबड दिसून येत आहे. एप्रिलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचाही साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता युगेंद्र पवारदेखील विवाहबंधनात अडकणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या पत्नी तनिष्का प्रभू यांचे शिक्षण परदेशात झाले असून त्यांनी फायनान्स या क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले आहे. तनिष्का या मूळच्या मुंबईच्या असून, दोघांचाही साखरपुडा अगदी खासगी समारंभात पार पडला.
या आनंददायी क्षणाच्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांच्याशी संबंधित एक जुना प्रसंगही चर्चेत आला आहे. युगेंद्र पवार यांच्या वाढदिवशी शरद पवार यांनी दिलेल्या शुभेच्छा देताना गमतीदार पद्धतीने विचारले होते की, “आता अक्षता टाकायची संधी कधी देताय? जास्त लांबवू नका.” या विधानानंतर अवघ्या काही आठवड्यांत युगेंद्र व तनिष्काचा साखरपुडा पार पडल्याने त्याचेही स्मरण झाले आहे.
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र असून, त्यांचा जन्म २२ एप्रिल १९९१ रोजी झाला. अमेरिकेतील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी येथून त्यांनी फायनान्स आणि इन्शुरन्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. सध्या ते शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय ते विद्या प्रतिष्ठान या नामवंत शैक्षणिक संस्थेचे खजिनदार देखील आहेत. शैक्षणिक आणि औद्योगिक कार्याबरोबरच युगेंद्र पवार हे सामाजिक उपक्रमांतही सक्रिय आहेत. त्यांनी ओढा खोलीकरण, विहीर बांधणी, वनीकरण यांसारख्या प्रकल्पांद्वारे ग्रामीण शेतकऱ्यांशी थेट संपर्क प्रस्थापित केला आहे.
क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी युवकांमध्ये स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव केवळ राजकीय वारशामुळेच नव्हे तर सामाजिक आणि नेतृत्वगुणांच्या आधारेही पुढे येते आहे.
युगेंद्र पवार आणि तनिष्का प्रभू यांच्या साखरपुड्यामुळे पवार कुटुंबाच्या सामाजिक वर्तुळात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या विवाहसोहळ्याची अधिकृत तारीख लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter