• Thu. Jul 24th, 2025

NewsDotz

मराठी

पिंपरीत बांधकाम साइटवर दुर्घटना; तिसऱ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू, एक जखमी

Jul 18, 2025
पिंपरीत बांधकाम साइटवर दुर्घटना; तिसऱ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू, एक जखमी पिंपरीत बांधकाम साइटवर दुर्घटना; तिसऱ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू, एक जखमी

पिंपरीतील चऱ्होली-आळंदी रोडवर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सुरक्षा जाळी व हेल्मेट नसल्यामुळे ही दुर्घटना घडली.

सायली मेमाणे

पुणे १८ जुलै २०२५ : पिंपरी – पुण्यातील चऱ्होली-आळंदी रोडवरील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोन मजूर खाली पडल्याने एकजण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत यशवंत सुतार (वय ५३, रा. वडगाव रोड, आळंदी) असे असून, जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव निरहार भिमन्ना मेलकेरी (वय ४३, रा. चह्योली बु., ता. हवेली) आहे. ही दुर्घटना अरविंद सोळंकी यांच्या चऱ्होली-आळंदी रोड येथील साइटवर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदाराने सुरक्षा नियमांचा भंग केला असून इमारतीच्या बाहेरील बाजूस आवश्यक ती सुरक्षा जाळी बसवलेली नव्हती. याशिवाय मजुरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले हेल्मेट व हर्नेससुद्धा न पुरवता थेट कामावर लावल्याने ही दुर्घटना घडली. या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा जीव गमवावा लागला असून दुसरा कामगार सध्या गंभीर जखमी अवस्थेत आहे.

या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल दुधमल यांनी आरोपी ठेकेदार अब्दुलगफार अब्बास राय (वय ५२, रा. चर्होली खुर्द, घोलपवस्ती, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीला अटक झालेली नाही.

ही पहिली वेळ नाही की पुण्यात अशा प्रकारच्या सुरक्षा अभावामुळे दुर्घटना झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कोंढवा परिसरात सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून लिफ्टच्या डक्टमधून खाली पडून एका १९ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणीही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यामुळे या प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत असून प्रशासनाने आणि बांधकाम व्यावसायिकांनी सुरक्षा उपाय योजनांची सक्त अंमलबजावणी करण्याची नितांत गरज आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune