पुणे विमानतळावर पक्ष्यांची संख्या वाढल्यामुळे बँकॉक व दिल्लीकडे जाणाऱ्या विमानांची उड्डाणे थांबवावी लागली. बर्ड स्ट्राइकचा धोका वाढतोय.
सायली मेमाणे,
२२ मे २०२४ : पुणे विमानतळाच्या हवाई क्षेत्रात मंगळवारी सकाळी अनेक पक्ष्यांचा वावर वाढल्यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. यामुळे बँकॉकला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण थांबवावे लागले, तर दिल्लीला जाणारे विमानसुद्धा विलंबाने रवाना झाले. या घटनेमुळे पुणे विमानतळावर पक्ष्यांचा धोका वाढतोय, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून पक्षी आढळल्याचा बर्ड सायटिंग अलर्ट दिला गेल्यानंतर तत्काळ विमान वाहतूक थांबवावी लागली. धावपट्टीच्या टेक-ऑफ भागात फटाके फोडून पक्ष्यांना हुसकावण्यात आले. त्यानंतरच विमानांची उड्डाणे सुरळीत करण्यात आली. विश्वसनीय सूत्रांनुसार, या घटनेमुळे पुण्याहून उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांना फटका बसला असून, बँकॉकच्या विमानाचे उड्डाण सुमारे दीड तास उशिराने झाले.
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या नियमानुसार प्रत्येक विमानतळावर पर्यावरण समिती स्थापन झालेली असते. ही समिती विमानतळ परिसरातील पर्यावरणीय अडचणींवर लक्ष ठेवते. विशेषतः बर्ड स्ट्राइकसारख्या प्रकारांवर नियंत्रण ठेवणे, पक्ष्यांच्या हालचालींचे विश्लेषण करणे आणि धोका टाळण्यासाठी उपाययोजना करणे, ही समितीची जबाबदारी असते. मात्र, मागील काही आठवड्यांपासून पुणे विमानतळावर पक्ष्यांचा, कुत्र्यांचा आणि बिबट्याचा वावर वाढलेला दिसून येतो. या पार्श्वभूमीवर पर्यावरण समितीची कार्यवाही कुठे आहे, असा सवाल उपस्थित होतो.
विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “धावपट्टी हवाई दलाच्या अखत्यारित असल्यामुळे तेथून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.”
हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर सांगतात की, “धावपट्टीजवळ पक्ष्यांच्या हालचाली वाढल्यास नियंत्रण कक्ष वैमानिकांना सतर्क करते. पक्षी धडकल्यास विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड होतो, जे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिशय गंभीर बाब असते. त्यामुळे हवाई नियंत्रण कक्षाला सतत जागरूक राहावे लागते.”
बर्ड स्ट्राइक म्हणजे काय? विमान उड्डाण करताना किंवा लँडिंगच्या वेळी जेव्हा पक्षी कमी उंचीवर असतात, तेव्हा त्यांच्या विमानाला थेट धडकण्याची शक्यता असते. अशा धडकेमुळे विमानाच्या पंखाला किंवा इंजिनाला नुकसान पोहोचू शकते. इंजिनमध्ये पक्षी ओढला गेला तर इंजिन बंद होण्याचा किंवा पेटण्याचा धोका निर्माण होतो. वैमानिकाने अचानक समोर आलेल्या पक्ष्याला चुकवण्याचा प्रयत्न केला तर नियंत्रण बिघडण्याचा धोका संभवतो. विंडशील्डवर पक्षी धडकल्यास दृश्यमानतेवर परिणाम होतो.
पुणे विमानतळ हे नागरी आणि लष्करी दोघांचे मिश्र विमानतळ असल्याने येथे सुरक्षा व्यवस्थेचा दर्जा अधिक काटेकोर असायला हवा. सध्या घडणाऱ्या घटना पाहता पर्यावरण समिती, हवाई दल आणि नागरी उड्डाण प्राधिकरण यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी व्हावा, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
या घटनांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे.