शिवीगाळ का करतोय अस विचारणाऱ्या वर हल्ला करणारे सराईत गुन्हेगार येरवडा पोलिसांनी केले अटक मोक्का अंतर्गत कारवाई
येरवडा पोलीस स्टेशनची मोठी कारवाई; मोक्का कायद्यान्वये आरोपींवर गुन्हे दाखल, तपास सुरू
येरवडा व विमानतळ पोलीसांनी मोक्का कायद्यान्वये दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी सचिन तिजोरे व अक्षय गायकवाड यांना अटक करून तपास सुरू आहे.
झोएब शेख
पुणे २२ सप्टेंबर २०२५ : पुणे : शिवीगाळ का करतो, याची विचारणा केल्याने दोघा भावांवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करुन त्यांना जखमी करणाऱ्या व मोक्का कारवाई केलेल्या दोघांची येरवडा पोलिसांनी त्यांच्याच भागात चंद्रमानगर येथून कमरझोनपर्यंत धिंड काढली.
सचिन रावसाहेब तिजोरे (वय ३५, रा. येरवडा), अक्षय सुरेश गायकवाड (वय २८, रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश मोहन वाघुंडे (वय ३७, रा. कॉमरझोन समोर, मेंटल ग्राऊंडजवळ, चंद्रमानगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात २६ जुलै २०२५ रोजी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सागर तिजोरे, सचिन तिजोरे, छोट्या कांबळे व त्यांच्या एका साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता. गणेश वाघुंडे हे घरात असताना सागर तिजोरे हा त्यांच्या घरी आला तुझा भाऊ बाप्पू कोठे आहे, त्याला बोलाव. आज तुम्हाला सोडणार नाही, असे बोलून शिवीगाळ करत होता. त्यांनी दरवाजा न उघडल्याने तो निघून गेला. त्यानंतर ते व त्यांच्या भाऊ सुशांत ऊर्फ बाप्पु हे त्याच्या घरी गेले. शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केल्यावर सागर तिजोरे व इतरांनी फिर्यादी व त्यांच्या भावावर धारदार शस्त्राने वार करुन डोक्यात व कपाळावर पितळी कळशीने मारहाण करुन गंभीर जखमी केले होते. यानंतर हे टोळके फरार झाले होते. त्यांच्याविरुद्ध बेकायदा जमाव जमवून दहशत माजविल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली होती.
सचिन तिजोरे व अक्षय गायकवाड यांना येरवडा पोलिसांनी नुकतीच अटक केली. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दोघांना कॉमरझोन परिसरात नेऊन त्यांची रस्त्यावरुन धिंड काढली. लोकांमध्ये दहशत पसरविणाऱ्यांची काय अवस्था होते, हे येरवडा पोलिसांनी कृतीतून दाखवून दिले.