Falcon 2000 जेट्स आता ‘मेड इन नागपूर’ | डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्सचा ऐतिहासिक करार

1
Falcon 2000 Jets आता नागपुरात तयार होणार!

Falcon 2000 Jets आता नागपुरात तयार होणार!

Falcon 2000 Jets आता नागपुरात तयार होणार! डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्सचा फ्रान्सबाहेर पहिलाच करार. भारत एरोस्पेस क्षेत्रात अमेरिकेच्या पंक्तीत.

सायली मेमाणे

१९ जून २०२५ : फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड यांच्यात पॅरिस एअर शोमध्ये झालेल्या ऐतिहासिक करारानुसार, आता Falcon 2000 बिझनेस जेट्सची निर्मिती प्रथमच फ्रान्सबाहेर भारतात, विशेषतः नागपूरच्या मिहान प्रकल्पात होणार आहे. या महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर महाराष्ट्राचा समावेश अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझीलसारख्या प्रगत देशांच्या यादीत झाला आहे. हे भारताच्या हवाई तंत्रज्ञान आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी क्रांतिकारी पाऊल ठरणार असून, 2028 पर्यंत पहिले मेड इन इंडिया Falcon नागपूरमधून बाहेर पडेल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या करारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाला तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला मोठा बूस्ट मिळणार आहे. नागपूरच्या मिहानमधील डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लि. हे एरोस्पेस उत्पादनात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून विकसित होणार असून, Falcon 2000 बरोबरच Falcon 8X आणि 6X यांच्याही असेम्ब्लीचे काम याच ठिकाणी होणार आहे. या संधीमुळे नागपूरसारख्या शहरात हजारो अभियंते, टेक्निशियन आणि स्थानिक तरुणांना उच्चस्तरीय रोजगार उपलब्ध होणार असून, महाराष्ट्राचे नाव जागतिक हवाई तंत्रज्ञान नकाशावर उजळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करताना याला महाराष्ट्राच्या एरोस्पेस भविष्यासाठी अभिमानास्पद टप्पा असे संबोधले. 2017 मध्ये स्थापन झालेल्या डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेसने याआधीच अनेक भागांचे उत्पादन सुरु केले होते. आता पूर्ण जेटचे उत्पादन भारतातच करणे ही ऐतिहासिक आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाची वाटचाल आहे. डसॉल्ट एव्हिएशन ही जगभरात 10 हजारांहून अधिक लष्करी व नागरी विमानांची निर्मिती करणारी कंपनी असून, ती सुमारे 90 देशांना विमानांचा पुरवठा करते. भारतात राफेलच्या माध्यमातून त्यांचं आधीच योगदान आहे, पण आता नागपूरमधून Falcon जेट्सची जागतिक डिलिव्हरी होणे, ही जागतिक विश्वासाची पावतीही मानली जात आहे.

NewsDotz Official Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

1 thought on “Falcon 2000 जेट्स आता ‘मेड इन नागपूर’ | डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्सचा ऐतिहासिक करार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed