Pune Crime: प्रेमविवाहाच्या रागातून कोयत्याने जीवघेणा हल्ला, शिरूर तालुक्यात ‘सैराट’सदृश घटना

प्रेमविवाहाच्या रागातून कोयत्याने जीवघेणा हल्ला, शिरूर तालुक्यात 'सैराट'सदृश घटना
पुण्यातील शिरूर तालुक्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला, सलूनमध्ये घुसून दुकानाची तोडफोड, तिघा आरोपींवर गुन्हा दाखल.
सायली मेमाणे
पुणे ७ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात टाकळी हाजी येथे प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने थेट जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ही घटना ‘सैराट’ चित्रपटातील प्रसंगाची आठवण करून देणारी असून, समाजात प्रेमसंबंधांवरील असहिष्णुतेचे भीषण दर्शन घडवत आहे. दत्तात्रय वाघ या २२ वर्षीय युवकावर त्याच्या पत्नीच्या मावसभावासह इतर दोघांनी सलूनमध्ये घुसून हल्ला केला. हा हल्ला इतका गंभीर होता की दत्तात्रयच्या मनगटावर आणि पाठीवर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय वाघ आणि त्याची पत्नी स्नेहा यांचा दोन महिन्यांपूर्वी आळंदीत प्रेमविवाह झाला होता. मात्र स्नेहाच्या कुटुंबीयांना हा विवाह मान्य नसल्याने वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. अखेर धमक्यांचे स्वरूप प्रत्यक्ष हिंसाचारात परिवर्तित झाले. दत्तात्रय टाकळी हाजी येथे कुडंई मेन्स पार्लर चालवत होता. तो दुकानात केस कापत असताना तीन आरोपी – जीवन गायकवाड, शारुख शेख आणि प्रशांत साठे – दुकानात घुसले व काचा फोडून, साहित्याची नासधूस करत त्याच्यावर कोयत्याने वार केले.
हल्ला करून आरोपी पळून जात असताना गावकऱ्यांनी धाडस दाखवत पाठलाग केला आणि शारुख शेख व प्रशांत साठे या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी या दोघांची चौकशी केली असता, जीवन गायकवाडच्या मदतीनेच हल्ला झाल्याची कबुली त्यांनी दिली. तिन्ही आरोपींवर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यात गंभीर मारहाण, दुकानाची तोडफोड आणि जीव घेण्याचा प्रयत्न यांचा समावेश आहे.
सध्या दत्तात्रय वाघ याच्यावर शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्याच्या तक्रारीवरून पुढील तपास पोलीस करत आहेत. ऑनर किलिंगसदृश घटनांच्या वाढत्या संख्येने समाजात प्रेम आणि विवाह स्वातंत्र्यावर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter