Pune Grand Tour 2026: पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या पर्वासाठी 900 कोटींची तरतूद 662 किमी रस्त्यांचे होणार बांधकाम

Pune Grand Tour 2026: पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या पर्वासाठी 900 कोटींची तरतूद 662 किमी रस्त्यांचे होणार बांधकाम
पुणे ग्रँड टूर 2026 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 662 किमी नवीन रस्ते, 331 गावे महामार्गांशी जोडणी, 14 जैवपर्यटन स्थळांचा विकास आणि नोव्हेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
पुणे १९ जून २०२६ : पुणे जिल्ह्यातील रस्ते विकास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर’ प्रकल्पाच्या दुसऱ्या पर्वासाठी तब्बल 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या टप्प्यात जिल्ह्यातील 662 किलोमीटर रस्त्यांचे नव्याने बांधकाम करण्यात येणार असून ग्रामीण भागाला शहरांशी तसेच राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांशी अधिक प्रभावी जोडणी मिळणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे ग्रँड टूरच्या पहिल्या टप्प्यात आठ तालुक्यांमध्ये 437 किलोमीटर रस्त्यांची उभारणी करण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यात 11 तालुक्यांमधील एकूण 1,099 किलोमीटर रस्त्यांचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी 662 किलोमीटर रस्ते नव्याने विकसित केले जाणार आहेत. दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर सुमारे 1,100 किलोमीटरचे आधुनिक रस्ते जाळे तयार होणार असून त्याचा ग्रामीण विकास, वाहतूक आणि पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे.

या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 362 कोटी रुपये आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत 240 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय पुणे महानगरपालिका हद्दीतील 85 किलोमीटर आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 35 किलोमीटर रस्त्यांचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे. काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास पर्यायी कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत 40 कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.
या रस्ते प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया जूनअखेर पूर्ण करून जुलै महिन्यात प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार आहे. सर्व संबंधित यंत्रणांना नोव्हेंबरअखेर कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भविष्यात रस्त्यांची पुन्हा खोदाई टाळण्यासाठी दूरध्वनी, गॅस, वीज, पाणीपुरवठा आणि ऑप्टिकल फायबरसाठी आवश्यक केबल व डक्ट टाकण्याची कामे सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या टप्प्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी जुन्नर–राजगुरुनगर आणि आळंदी–लोणावळा हे दोन नवीन पर्यटन मार्ग विकसित करण्यात येणार आहेत. या मार्गांमुळे धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. तसेच खेड, आंबेगाव आणि जुन्नर या आदिवासी तालुक्यांनाही या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात 148 गावे नव्या रस्त्यांशी जोडली गेली होती, तर दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर एकूण 331 गावे राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्याशी जोडली जाणार आहेत.
रस्ते विकासासोबतच जिल्ह्यातील जैवपर्यटनाला प्रोत्साहन देण्यावरही प्रशासनाने भर दिला आहे. वन विभागामार्फत 14 जैवपर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार असून पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, गतवर्षीच्या पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धेला आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाकडून 2.2 मानांकन मिळाले होते. यंदा हे मानांकन वाढून 2.1 करण्यात आले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिक नामांकित सायकलपटूंना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare