Pune News : “ही भरती केवळ भ्रष्टाचाराला आमंत्रण” — विद्यार्थी संघर्ष कृती समितीचा आरोप; राज्यपालांकडे स्थगितीची मागणी

0
Pune News : “ही भरती केवळ भ्रष्टाचाराला आमंत्रण” — विद्यार्थी संघर्ष कृती समितीचा आरोप; राज्यपालांकडे स्थगितीची मागणी

Pune News : “ही भरती केवळ भ्रष्टाचाराला आमंत्रण” — विद्यार्थी संघर्ष कृती समितीचा आरोप; राज्यपालांकडे स्थगितीची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १११ शिक्षकी पदांच्या भरती प्रक्रियेला विद्यार्थी संघर्ष कृती समितीने विरोध दर्शवला आहे. “ही भरती भ्रष्टाचाराला आमंत्रण आहे,” असा आरोप करत समितीने राज्यपालांकडे प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली असून, तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

सायली मेमाणे

५ ऑक्टोबर २०२५ : पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी कुलसचिव आणि अधिष्ठाता नसल्याने प्रशासनिक कामकाजावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठ प्रशासनाने नुकतीच १११ शिक्षकी पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. मात्र, या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून ती केवळ भ्रष्टाचाराला आमंत्रण देणारी असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थी संघर्ष कृती समितीने केला आहे. समितीचे राज्याध्यक्ष राहुल ससाणे यांनी राज्यपालांना निवेदन देऊन ही भरती प्रक्रिया तातडीने स्थगित करण्याची मागणी केली आहे.

विद्यापीठ प्रशासनाने ४ नोव्हेंबर रोजी सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील १११ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. तथापि, समितीच्या मते, मागील दोन वर्षांपासून अशा जाहिराती वेळोवेळी प्रसिद्ध होत आहेत, पण प्रत्यक्षात कोणतीही भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही. “दरवेळी निवडणुकीच्या तोंडावर जाहिरात काढली जाते आणि उमेदवारांना आशा दाखवून त्यांचा उपयोग राजकीय फायद्यासाठी केला जातो,” असा आरोप ससाणे यांनी केला.

सध्या विद्यापीठात प्रभारी अधिकाऱ्यांकडेच सर्व अधिकार असून, या काळात कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याचा दावा समितीने केला आहे. विशेषतः इस्टेट विभागातील ३०० कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचार, तंत्रज्ञान विभागातील अनियमितता आणि विद्यापीठाच्या ठेवींतील संशयास्पद हालचालींचा उल्लेख समितीने केला. काही प्रकरणांवर चौकशी सुरू असून, काहींचे फॉरेन्सिक ऑडिट अद्याप सुरू आहे.

भरती प्रक्रियेसंदर्भात भ्रष्टाचाराचे कुजबुज सुरू असल्याचा आरोप समितीने स्पष्टपणे केला आहे. “एका प्राध्यापक पदासाठी तब्बल एक कोटी रुपयांची बोली लावली जात आहे,” अशी चर्चा विद्यापीठ परिसरात सुरू आहे, असं ससाणे यांनी सांगितलं. काही अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषदेतील सदस्य आपापले उमेदवार पुढे करण्यासाठी दबाव आणत असल्याची माहितीही समितीने दिली.

तसेच, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ५२ कंत्राटी पदांच्या मुलाखती पार पडूनही निकाल जाहीर करण्यात आलेला नाही, असा आरोपही समितीने केला आहे. नव्या जाहिरातीत आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भातही अनेक त्रुटी असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया थांबवून सर्वप्रथम विद्यापीठात कायमस्वरूपी कुलसचिव आणि अधिष्ठाता यांची नियुक्ती करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

“भरती प्रक्रियेत पारदर्शकता नसेल, चौकशांचे निकाल सार्वजनिक केले नाहीत आणि न्यायालयीन याचिकांची माहिती लपवली गेली, तर विद्यार्थी संघर्ष कृती समिती तीव्र आंदोलन करेल,” असा इशारा राहुल ससाणे यांनी दिला आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, “आवश्यक असल्यास न्यायालयीन मार्ग अवलंबला जाईल. ही लढाई केवळ विद्यार्थ्यांची नसून, शिक्षण व्यवस्थेतील प्रामाणिकतेसाठी आहे.”

राज्यपालांकडे देण्यात आलेल्या निवेदनात समितीने मागणी केली आहे की, विद्यापीठात कायमस्वरूपी पदभरती करण्यापूर्वी प्रलंबित चौकशांचे निकाल जाहीर करावेत, फॉरेन्सिक ऑडिटचे अहवाल सार्वजनिक करावेत आणि भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकतेने राबवावी.

या आरोपांनंतर पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तथापि, या प्रकरणामुळे विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली असून, भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed