डॉ. पराग काळकर : भविष्यासाठी स्मार्ट ग्रंथालयांची गरज; पुण्यात डेलनेटच्या २८व्या नेंक्लिन परिषदेला सुरुवात

डॉ. पराग काळकर : भविष्यासाठी स्मार्ट ग्रंथालयांची गरज; पुण्यात डेलनेटच्या २८व्या नेंक्लिन परिषदेला सुरुवात
पुण्यात डेलनेटच्या २८व्या नेंक्लिन राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना डॉ. पराग काळकर यांनी भविष्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज स्मार्ट ग्रंथालयांची आवश्यकता व्यक्त केली. देशभरातील २५० हून अधिक ग्रंथपालांचा सहभाग.
पुणे ३ डिसेंबर २०२५ : पुणे येथे डेव्हलपिंग लायब्ररी नेटवर्क (डेलनेट, नवी दिल्ली), यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) आणि ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (एआयएसएसएमएस) यांच्या संयुक्त विद्यमाने २८व्या नेंक्लिन राष्ट्रीय परिषदेचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयांनी केवळ पुस्तक संग्रहालय न राहता स्वतःला स्मार्ट लायब्ररी म्हणून विकसित करणे अत्यावश्यक असल्याचे मत डॉ. काळकर यांनी व्यक्त केले.

हॉटेल लेमन ट्री प्रीमियर येथे झालेल्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. काळकर म्हणाले की, आज कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने प्रगत होत असताना डेलनेटसारख्या संस्थांनी स्वतःच्या ज्ञानसंपदेला एकत्रित करणारी स्वतंत्र एआय प्रणाली विकसित करणे भविष्यातील गरज ठरणार आहे. देशातील सर्वाधिक संख्येने ग्रंथालयांना जोडण्याचे कार्य करणाऱ्या डेलनेटने पुण्यासारख्या विद्यानगरीत परिषद आयोजित केल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. संशोधक आणि वाचक नेमके कोणत्या प्रकारच्या पुस्तके आणि संसाधनांसाठी ग्रंथालयात येतात, याचे अचूक आकलन करून त्यांना योग्य माहिती उपलब्ध करून देणे ही ग्रंथपालांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

परिषदेत डेलनेटची स्मरणिका आणि पूर्व प्रकाशनांचेही प्रकाशन करण्यात आले. यावर्षीच्या परिषदेसाठी ‘ग्रंथालयांसाठी नवीन सीमा निर्माण करणे – अन्वेषण, नवोन्मेष, उत्क्रांती आणि परिवर्तनाला चालना’ ही मध्यवर्ती संकल्पना असून पाच डिसेंबरपर्यंत परिषद चालणार असल्याची माहिती डेलनेटच्या संचालिका डॉ. संगीता कौल यांनी प्रास्ताविकातून दिली.
उद्घाटन सत्रात यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी वाचन संस्कृतीच्या घटत्या प्रवाहाबद्दल चिंता व्यक्त करत, समाजमाध्यमांच्या आहारी गेलेल्या तरुणांनी पुस्तकांकडे वळणे आवश्यक असल्याचे सांगितले. ग्रंथपाल हे केवळ पुस्तकांचे आदानप्रदान करणारे नसून ज्ञानभांडाराचे संरक्षक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुजाण पिढी घडू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एआयएसएसएमएसचे प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमाने यांनी डेलनेटच्या कार्याची आणि नेंक्लिन परिषदेच्या ग्रंथपालांसाठी असलेल्या महत्त्वाची सविस्तर माहिती दिली.
डेलनेटचे अध्यक्ष के. जयकुमार यांनी अध्यक्षीय भाषणात बदलत्या काळानुसार ग्रंथपालांनी स्वतःचे कौशल्य वाढवणे, डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि माहितीची सुरक्षा राखणे या क्षेत्रांत प्रगती करणे अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले. परिषदेसाठी देशभरातून २५० हून अधिक ग्रंथपाल आणि ग्रंथालय तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ सहभागी झाले असून कृत्रिम बुद्धिमत्ता, तांत्रिक प्रगती, सायबर सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, संशोधन पद्धती, डिजिटल युगातील वाचन संस्कृती आदी विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
या परिषदेच्या माध्यमातून देशातील ग्रंथालय क्षेत्राला नव्या दिशा मिळणार असून स्मार्ट लायब्ररी संकल्पनेच्या बळकटीकरणासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा विश्वास आयोजक संस्थांनी व्यक्त केला आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare