Swargate Case: प्रताप सरनाईकांचा संताप – “दोषी अधिकाऱ्यांची पुन्हा नियुक्ती कशी?”; तात्काळ कारवाईचे आदेश
प्रताप सरनाईकांचा संताप – “दोषी अधिकाऱ्यांची पुन्हा नियुक्ती कशी?”; तात्काळ कारवाईचे आदेश
Swargate Rape Case: दोषी अधिकाऱ्यांची निलंबनानंतर पुन्हा स्वारगेट आगारात नियुक्ती झाल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भडकले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना फटकारत तातडीने कारवाईचे आदेश दिले.
सायली मेमाणे
पुणे १७ सप्टेंबर २०२५ : Swargate Case: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. फेब्रुवारी 2025 मध्ये घडलेल्या या घटनेनंतर एसटी महामंडळातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र आता धक्कादायक बाब समोर आली आहे की, चौकशीत दोषी ठरलेले अधिकारी पुन्हा त्याच स्वारगेट आगारात नियुक्त करण्यात आले आहेत. यामुळे राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक संतप्त झाले असून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फटकारले.
सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आम्ही विधानसभेत उत्तर देतो आणि जनतेला विश्वास देतो की कारवाईनंतर सुधारणा होईल. परंतु दोषी अधिकाऱ्यांची पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती करणे म्हणजे लोकांमध्ये चुकीचा संदेश जाणे होय. हे नियमाला धरून नाही. त्यामुळेच त्यांनी या प्रकरणात तातडीने कारवाईचे आदेश दिले असून संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीसही देण्यात येणार आहे. दोषींना पाठीशी घालणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे दौऱ्यावर असताना प्रताप सरनाईक यांनी लोणावळा, शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानकांची पाहणी केली. यावेळी प्रवासी प्रतीक्षालय, स्वच्छतागृह आणि चालक-वाहक विश्रांतीगृह तपासण्यात आले. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांकडून आलेल्या तक्रारीही त्यांनी ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याचे आदेश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला.
या प्रकरणाची पार्श्वभूमी लक्षात घेता, फेब्रुवारीत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर वरिष्ठ आगार व्यवस्थापक, कनिष्ठ आगार व्यवस्थापक आणि दोन सहायक वाहतूक अधीक्षकांना निलंबित करण्यात आले होते. विधानभवनात प्रताप सरनाईक यांनी स्वतः निवेदन देऊन या घटनेबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर अपेक्षा होती की विभागीय चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कठोर कारवाई होईल. मात्र निलंबनानंतरही त्यांची त्याच आगारात नियुक्ती झाल्याने प्रशासनावरील विश्वास डळमळीत होतोय.
सरनाईक यांनी याबाबत स्पष्ट केले की, विभागीय चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून दोषींना इतरत्र बदली करणे गरजेचे होते. परंतु प्रादेशिक व्यवस्थापकांनी त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी नेमले, जे प्रशासनाच्या नियमांना विरोधात आहे. या चुकीमुळे समाजात असा संदेश गेला की दोषींना पाठीशी घालण्यात येत आहे. त्यामुळे आता अशा निर्णयांवर कठोर भूमिका घेऊन तातडीने बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्वारगेट प्रकरणामुळे पुन्हा एकदा परिवहन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक असून दोषींना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न स्वीकारला जाणार नाही, हे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या हस्तक्षेपामुळे आता दोषींवर कठोर कारवाई होऊन भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.