मुंबई-पुणे बुलेट ट्रेनने अवघ्या 48 मिनिटांत प्रवास! पुणे-हैदराबादही 2 तासांत मोठी घोषणा

मुंबई-पुणे बुलेट ट्रेनने अवघ्या 48 मिनिटांत प्रवास! पुणे-हैदराबादही 2 तासांत मोठी घोषणा
मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे अवघ्या 48 मिनिटांत प्रवास शक्य होणार असून पुणे-हैदराबाद प्रवासही 2 तास 8 मिनिटांत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. जाणून घ्या संपूर्ण अपडेट.
पुणे १७ जून २०२६ : मुंबई आणि पुणे यांच्यातील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांमुळे मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटांत पूर्ण होणार असून, पुणे ते हैदराबाद प्रवासही सुमारे 2 तास 8 मिनिटांत शक्य होईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या प्रकल्पांमुळे राज्यातील उद्योग, लॉजिस्टिक्स आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जबिल कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाविषयी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील. जलद प्रवासामुळे उद्योग, रोजगार, गुंतवणूक आणि सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळेल.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जेएनपीटी आणि अंतिम टप्प्यात असलेल्या वाढवण बंदराला समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडण्याचा प्रस्तावही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसमोर मांडला. हा कॉरिडॉर जालना, वर्धा येथील ड्राय पोर्टमार्गे गडचिरोलीपर्यंत विस्तारला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पामुळे मालवाहतुकीचा खर्च 7 ते 8 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा असून महाराष्ट्र जागतिक पुरवठा साखळीतील महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र हा देशातील डेटा सेंटर हब म्हणून वेगाने विकसित होत असल्याचे नमूद केले. देशातील सुमारे 60 टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्रात विकसित होत असून इलेक्ट्रॉनिक्स, डीप टेक, सेमीकंडक्टर आणि चिप उत्पादन क्षेत्रासाठी राज्यात सक्षम औद्योगिक परिसंस्था उभारण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये महाराष्ट्राने देशात अग्रस्थान मिळविल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जबिलच्या पुणे प्रकल्पाचे कौतुक करत भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील विश्वासार्ह भागीदार बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग 13 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून इलेक्ट्रॉनिक्स ही भारताची तिसरी सर्वात मोठी निर्यात श्रेणी बनल्याचे त्यांनी सांगितले. गुणवत्ता, कौशल्य विकास आणि उच्च-अचूकता उत्पादनावर भर देत भारताला इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत जागतिक नेतृत्व मिळवून देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई-पुणे बुलेट ट्रेन आणि पुणे-हैदराबाद वेगवान रेल्वे संपर्कामुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. तसेच उद्योग, पर्यटन, व्यापार आणि गुंतवणुकीलाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, जलद आणि जागतिक दर्जाची होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडत असल्याचे मानले जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare