• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

पुणे प्राईड मार्च 2025: ट्रान्स ढोल-ताशा पथक आणि मातांचा स्तुत्य सहभाग

Jun 2, 2025
पुणे प्राईड मार्च 2025 मध्ये सहभागी मातांसह ट्रान्स ढोल-ताशा पथकपुणे प्राईड मार्च 2025 मध्ये सहभागी मातांसह ट्रान्स ढोल-ताशा पथक

पुणे प्राईड मार्च 2025 मध्ये ट्रान्स ढोल-ताशा पथक आणि मुलांसह सहभागी मातांनी उपस्थिती लावली. DEI धोरणांतील कपातीनंतर ही पहिली एकत्रित आयोजित प्राईड होती.
सायली मेमाणे,

पुणे : २ जून २०२५ : २०२५ मध्ये आयोजित झालेला पुणे प्राईड मार्च हा पुणे शहरातील LGBTQIA+ समुदायासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला. गेल्या काही काळात अनेक कंपन्यांनी विविधता, समानता आणि समावेशन (DEI) धोरणातून माघार घेतल्यामुळे, अशा कठीण काळात हा प्राईड मार्च समुदायासाठी नवा आत्मविश्वास देणारा ठरला. यंदा विशेष म्हणजे ही प्राईड फक्त एका संस्थेने नव्हे, तर विविध संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीपणे पार पडली. MIST LGBTQ Trust, Manthan Foundation, Jeevika, Pune Queer Sports Club, Qutcast Shikhandi (ट्रान्स ढोल-ताशा पथक), NHRD आणि Muktaaa Charitable Foundation यांनी एकत्र येऊन हा मार्च आयोजित केला.

सामाजिक स्वीकारासाठी लढा देणाऱ्या समुदायासोबत या वर्षी अनेक मातांनी स्वतःची मुले-मुली घेऊन सहभाग घेतला. या मुलांना बालवयातच समजूतदारपणाची आणि सहिष्णुतेची शिकवण देण्यासाठी प्राईडसारख्या कार्यक्रमात त्यांना घेऊन जाणे, ही पालकांनी उचललेली सकारात्मक पावले होती. पुण्यातील ओजस या आईने आपला १२ वर्षांचा मुलगा घेऊन या प्राईडमध्ये भाग घेतला. तिच्या मते, “समलैंगिकता आणि लैंगिक ओळख यासंदर्भात योग्य माहिती मिळावी, हे मुलांसाठी आवश्यक आहे. ally म्हणून माझं कर्तव्य आहे की पुढच्या पिढीला सुसंस्कृत आणि समजूतदार बनवावं.” एका अन्य आईने स्पष्टपणे सांगितलं की सोशल मीडियावर LGBTQ समुदायाविषयी फारच द्वेषयुक्त आणि चुकीची माहिती पसरली आहे. त्यामुळे तिने स्वतःच्या दोन्ही मुलांना घेऊन प्रत्यक्ष प्राईडमध्ये आणलं, जेणेकरून ते खऱ्या अर्थाने समुदायाच्या अस्तित्वाची ओळख करून घेऊ शकतील.

या मार्चमध्ये सर्वात लक्षवेधी ठरले ते म्हणजे Qutcast Shikhandi या ट्रान्स व्यक्तींनी स्थापन केलेलं ढोल-ताशा पथक. पारंपरिक वाद्यांच्या गजरात त्यांनी या प्राईडला सळसळती ऊर्जा दिली. ही केवळ सांस्कृतिक अभिव्यक्ती नव्हे, तर अस्तित्व आणि आत्मसन्मान यांचा जिवंत आरंभ होता. ट्रान्स समुदायाचा हा आत्मविश्वास पाहून अनेक प्रेक्षक भारावून गेले.

या वर्षीचा पुणे प्राईड मार्च हा संस्थात्मक सहभागाच्या दृष्टीने वेगळा होता. फक्त एक संस्थाच नव्हे, तर अनेक संस्था आणि गटांनी मिळून सामूहिक आयोजन केलं. DEI धोरणांतील कपात आणि निधी अभाव यामुळे पूर्वीप्रमाणे मोठे स्पॉन्सर मिळणं कठीण झालं होतं, पण सामूहिकतेच्या बळावर प्राईड अधिक उत्साहात पार पडली.

MIST Foundation चे संचालक सूरज राऊत यांनी सांगितले की त्यांचा लहान भाचा ठाणे प्राईडचे फोटो पाहून एवढा प्रभावित झाला की त्याने पुणे प्राईडला यायची उत्सुकता व्यक्त केली. “त्याने स्वतःसाठी एक पोस्टर बनवलं आणि पूर्ण वेळ उत्साहात सहभागी झाला,” असं सूरज राऊत म्हणाले. ही घटना दर्शवते की, लहान वयात योग्य संस्कार आणि सामाजिक जाणिवा दिल्यास नव्या पिढ्या अधिक स्वीकारशील आणि संवेदनशील होतात.

पुणे प्राईड मार्च 2025 हे केवळ LGBTQ समुदायासाठी नव्हे, तर समाजातील सर्व घटकांसाठी एक शिकवण देणारं व्यासपीठ ठरलं. ट्रान्स व्यक्तींच्या वाद्यपथकापासून ते पालकांच्या सकारात्मक सहभागापर्यंत, या मार्चने समाजात आशेचा नवा किरण दाखवला. या कार्यक्रमातून एक गोष्ट स्पष्ट झाली – शहरी प्रगती ही केवळ इमारतींच्या उंचीवरून नाही, तर सामाजिक स्वीकारावरून मोजली जाते.